अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शिक्षण विभागाला विसर ? दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात, विद्यार्थी  वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत 

2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अद्याप वेबसाईटच तयार झाली नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे यंदा शिक्षण विभागाला अकरावी प्रवेश प्रक्रियेचा विसर पडला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शिक्षण विभागाला विसर ? दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात, विद्यार्थी  वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीचा निकाल (10 th Class Result)जाहीर होण्यापूर्वी राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (11th Online Admission Process)सुरू केली जाते.मात्र, 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अद्याप वेबसाईटच तयार झाली नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे यंदा शिक्षण विभागाला (Department of Education)अकरावी प्रवेश प्रक्रियेचा विसर पडला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मात्र,'शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाईन प्रवेशाबाबत तयारी सुरू केली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नियमितपणे ऑनालाईन प्रवेश प्रवेश प्रक्रिया सुरू होईल',असे राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी (Director of Secondary Education Sampat Suryavanshi)यांनी सांगितले. 

दरवर्षी साधारणपणे इयत्ता दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो.त्यापूर्वी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते.परंतु,यंदा दहावीचा निकाल मे महिन्यातच जाहीर होणार आहे.तत्पूर्वी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रकिया सुरू होणे अपेक्षित होते.मात्र,अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही.दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरून घेतला जातो.तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जातील  दूसरा भाग म्हणजेच कॉलेजचे पसंतीक्रम भरून घेण्यास सुरूवात केली जाते.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र महाविद्यालयांना नोंदणी करावी लागते.मात्र,अद्याप वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रियेस यंदा विलंब होण्याची शक्यता आहे.दरवर्षी अकरावी प्रवेशाच्या सुमारे आठ ते नऊ फेऱ्या होतात. बऱ्याच वेळा ऑक्टोबर -नोव्हेंबर महिना उजाडला तरी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरूच राहते.त्यामुळे या वर्षी दहावीचा निकाल लवकर लागून सुध्दा अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर होऊ शकतो,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
-------------------------------------------


राज्य शासनाने जुन्याच एजन्सीला अकरावी प्रवेशाचे काम करण्याची जबाबदारी सोपवली असून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांबरोबर दोन बैठका झाल्या आहेत.त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही अकरावी प्रवेश प्रकीयेचे काम वेळेत सुरू होईल.

- संपत सूर्यवंशी , माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट राज्य,