विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आंदोलन स्थगित

विद्यापीठात बुधवारी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघटनेच्या विविध मागण्यांवर तोडगा निघाला. कर्मचाऱ्यांनी आंदोलन  स्थगित केल्यामुळे आता विद्यापीठातील कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे.

विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आंदोलन स्थगित
Pune university

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (sppu ) शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीने दोन दिवस कामबंद आंदोलन (Pune University Non Teaching  protest ) केले. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत संघटनेच्या विविध मागण्यांवर तोडगा निघाला. कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केल्यामुळे आता विद्यापीठातील कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे.

विद्यापीठातील सर्वच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होत होता. बुधवारी रात्री विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विजय खरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी कर्मचारी संघटनेचे डॉ. सुनील धिवार, संतोष मदने, बाळासाहेब आंत्रे, शिवाजी उत्तेकर, रघुवीर व्हावळ, किशोर घडीयार, बसवंत गजलवार, अशोक रानावडे, संजय नेवसे, मंगेश कुडवे, प्रभू देवकर, चेरीयल, सहदेव ढोरमारे, हनुमंत खांदवे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या 7 मे 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या निर्णयानुसार आतापर्यंत विद्यापीठातील अनेक कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री देण्यात आले आहे.मात्र, जानेवारी 2023 पासून उर्वरित सेवकांना पदोन्नत्या दिल्या गेल्या नाहीत. त्यावर तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी संघटनेने आंदोलन केले होते. परंतु, याबाबत विद्यापीठाच्या विविध अधिकाऱ्यांशी व वकिलांची चर्चा करून २२ जुलैनंतर निर्णय घेण्यात येईल,असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

विद्यापीठ फंडातून काही वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून त्यांच्या नियुक्तीस वारंवार मरत वाढ दिली जात आहे. या पुढील काळात या अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊ नये. तसेच त्यांना विद्यापीठातील कायमसेवकाप्रमाणे देण्यात आलेल्या आर्थिक सवलती बंद कराव्यात. नव्याने सेवानिवृत्तीनंतर सेवकांची पुनर्नियुक्ती करताना शासन निर्णयानुसार विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या इतर सेवानिवृत्त सेवक अधिकारी यांच्या प्रमाणे करण्यात यावी. प्रशासनाचा कोणताही प्रस्ताव नसताना व्यवस्थापन परिषदेमार्फत विद्यापीठ खंडातून नव्याने निर्मित करण्यात आलेल्या दोन सहायक कुलसचिव पदांचे ठराव रद्द करण्यात यावेत. आदी मागण्यांना व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवून मान्यता घेणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. त्यामुळे आंदोलन स्थगित केले आहे,असे संघटनेचे पदाधिकारी संतोष मंदने यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना स्पष्ट केले.