अखेर NTA महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची हकालपट्टी; NEET-PG प्रवेश परीक्षा सुध्दा पुढे ढकलली

अखेर NTA महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची हकालपट्टी; NEET-PG प्रवेश परीक्षा सुध्दा पुढे ढकलली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET (UG) आणि UGC-NET पेपर लीकबाबत सुरू असलेल्या गदारोळात केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्राने नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक सुबोध कुमार सिंग (NTA Director General Subodh Kumar Singh)यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी माजी केंद्रीय सचिव प्रदीप सिंह खरोला (Former Union Secretary Pradeep Singh Kharola)यांना एनटीएच्या महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सुबोध कुमार सिंग यांना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात (DoPT) सक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

NEET आणि UGC NET पेपर लीकच्या वादाच्या दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते की दोषी आढळलेल्या सर्व NTA अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,  याशिवाय, शनिवारी शिक्षण मंत्रालयाने एनटीए सुधारण्यासाठी आणि पेपर लीक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. समितीच्या स्थापनेनंतर काही तासांतच एनटीएच्या महासंचालकांना पदावरून हटवण्यात आले. पेपर लीक प्रकरणी सरकारचे हे मोठे पाऊल मानले जात आहे.
त्यामुळे उद्या होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. काही स्पर्धात्मक परीक्षांच्या अखंडतेबाबतच्या आरोपांबाबतच्या घटना लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतलेल्या NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आज 23 जुन रोजी होणारी  NEET PG परीक्षा आरोग्य मंत्रालयाने पुढे ढकलली आहे. या परीक्षेसाठी दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. अद्याप परीक्षा रद्द केल्याचे कारण पुढे आलेले नाही. NEET PG परीक्षेद्वारे, वैद्यकीय विद्यार्थ्यांना देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. आता ही परीक्षा कधी होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही