NEET पेपर फुटीचे महाराष्ट्र कनेक्शन; लातूरचे दोन शिक्षक एटीएसच्या जाळ्यात

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला आहे. गुजरात, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि बिहारनंतर या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. 

NEET पेपर फुटीचे महाराष्ट्र कनेक्शन;  लातूरचे दोन शिक्षक एटीएसच्या जाळ्यात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या देशभर सुरू असलेल्या NEET परीक्षेतील (NEET Exam) पेपर फुटीचे (Paper leak) धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना एटीएसने (ATS) ताब्यात घेतले आहे. देशभर चर्चेचा विषय बनलेल्या या प्रकरणात पहिली विकेट पडली आहे. नीटचे महासंचालक सुबोधकुमार सिंह (Subodh Kumar Singh) यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्रदीपसिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला आहे. गुजरात, हरियाणा, पंजाब, झारखंड आणि बिहारनंतर या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. 

लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी हजारो विद्यार्थी राज्यभरातून येतात. याचाच गैरफायदा घेऊन नीट परीक्षेचा पेपर फोडणारे रॅकेट लातूरमध्ये चालत असावे, असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे आता ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांकडून काही माहिती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. एटीएसच्या पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापा टाकत या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. 

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतल्या नीट या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी लातूरमध्ये दोन शिक्षकांना एटीएसच्या पथकाने संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही शिक्षक हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत . संजय जाधव आणि जलील पठाण असे या दोन शिक्षकांची नावे आहेत. संजय जाधव हे चाकूर तालुक्यातल्या बोथी येथील रहिवाशी आहेत. तसेच  सोलापूर जिल्ह्यातल्या टाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक आहेत. तर जलील पठाण हे लातूर जवळच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवितात.