प्राध्यापक संघटनेचे २८ जूनला पुण्यात बेमुदत उपोषण 

सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक यासारख्या पदांना १०० टक्के मान्यता देऊन ही सर्व पदे तात्काळ भरण्यात यावी, यासारख्या अन्य मागण्या या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 

प्राध्यापक संघटनेचे २८ जूनला पुण्यात बेमुदत उपोषण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या (Maharashtra New Professor Association) वतीने उच्च शिक्षण संचालनालय पुणे (Directorate of Higher Education Pune) येथे २८ जून रोजी सकाळी १०:३० वाजता बेमुदत उपोषण (Fasting to death) करण्यात येणार आहे. शासनाने १ ऑक्टोबर २०१७ च्या आकृती बंधातील मंजूर पदांतील रिक्त झालेल्या सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक यासारख्या पदांना १०० टक्के मान्यता देऊन ही सर्व पदे तात्काळ भरावी, यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. 

तासिका तत्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या अध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार प्रति तासिका १ हजार ५०० रुपये मानधन वर्षातील ११ महिने देऊन प्रतिमाह त्याच्या खात्यावर जमा करावे. तासिका तत्वावरील अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा. सहायक प्राध्यापक पदभरतीचे नाहरकत प्रमाणपत्र उच्च शिक्षण सह संचालक स्तरावर देण्यात यावे. महाराष्ट्रातील २४ जून २००१ पासूनचे कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित तत्वावर परवानगी देण्यात आलेल्या महाविद्यालयांना व तुकड्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे. अकृषी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीवरील बंदी तात्काळ उठवून त्वरित पदभरती करावी. 

कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना NAAC मुल्यांकनात (Grade A, B) पडलेल्या सर्व महाविद्यालयांना तात्काळ १०० टक्के  अनुदान देण्यात यावे. अनुदानित महाविद्यालयातील NAAC मूल्यांकनात (Grade A, B) पडलेल्या महाविद्यालयातील कायम विनाअनुदानित तुकड्यांना १०० टक्के अनुदान द्यावे, अशा मागण्यासाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने उपोषण व आंदोलन ककेळके जाणार आहे.