नव्या धोरणात व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबत संशोधनावर भर : चंद्रकांत पाटील

भारती विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारे जीवनसाधना गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

नव्या धोरणात व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबत संशोधनावर भर : चंद्रकांत पाटील
Bharati Vidyapeeth award Ceremony

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन शैक्षणिक धोरणामुळे (NEP 2020) माणसाकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टीकोन वाढण्यास मदत होणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात नावीन्याला पर्याय नाही. त्यामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासोबत संशोधनावर (Research) विशेष भर देण्यात येत आहे. विद्यापीठानेही (University) विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २८ व्या  स्थापना दिन समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारे जीवनसाधना गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील,  कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

हेही वाचा : MPSC Online Exam : व्यापम घोटाळा महाराष्ट्रात होवू देऊ नका!

अनेक पुढारी दुसऱ्यांनी उभी केलेली शिक्षण संस्था बळकावून शिक्षण महर्षी बनत आहेत पण पतंगराव कदम यांनी मात्र स्वकष्टाने भारती विद्यापीठ उभे केल्याची भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. जेरे म्हणाले, येणाऱ्या काळात नोकऱ्यांमध्ये खूप मोठे बदल होणार आहेत. आपण गिगा इकॉनॉमीकडे वाटचाल करत आहोत. पूर्वीप्रमाणे एकदा पदवी घेतली की झाले, असे चालणार नाही. दर दहा वर्षानंतर आपल्याला शिकत राहावे लागणार आहे. तरुण पिढीला शिकवणे हे आजच्या शिक्षकासमोर मोठे आव्हान आहे. यासाठी आपण तयार व्हायला हवे.  

हेही वाचा : विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग; विविध करारांवर शिक्कामोर्तब

भारती विद्यापीठाने गेल्या ५८ वर्षात सामाजिक बांधिलकीचे भान जपून समाज आणि विद्यापीठ यांच्यात संवादाचे पूल उभे करून समाजकार्यात मोलाचे योगदान दिल्याचे डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले. डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवे आव्हान शिक्षण क्षेत्रासमोर आहे.  परदेशी विद्यापीठांच्या आगमनामुळे इथल्या विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करावी लागणार आहे.  

मूल्यवर्धित शिक्षणाचा उपक्रम भारती विद्यापीठाने त्यांच्या शाळांमध्ये राबवायला हवा, अशी अपेक्षा मुथा यांनी व्यक्त केली. तर मला मिळालेला हा पुरस्कार हा राजर्षी शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा पुरस्कार असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली. डॉ. ज्योती मंडलिक आणि राजेंद्र उत्तुरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.