कुलगुरूंची वर्षपूर्ती : विद्यार्थी केंद्रबिंदू , आंतरराष्ट्रीय मानांकन वाढवण्यावर भर; परदेशात विद्यापीठाचे कॅम्पस सुरू करणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी 7 जून 2023 रोजी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. यानिमित्ताने डॉ. गोसावी यांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधला.

कुलगुरूंची वर्षपूर्ती : विद्यार्थी केंद्रबिंदू , आंतरराष्ट्रीय मानांकन वाढवण्यावर भर; परदेशात विद्यापीठाचे कॅम्पस सुरू करणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University)मानांकन केवळ भारताच नाहीच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठाच्या सर्व अधिकार मंडळांना विश्वासात घेऊन परदेशात विद्यापीठाचे कॅम्पस सुरू करणे व परदेशी विद्यापीठांबरोबर करार करून संयुक्तपणे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला जात आहे. इंटरनॅशनलायजेशन ऑफ फायर एज्युकेशनच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील असून आर्थिक स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाकडून विविध प्रकल्पावर काम केले जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याला रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली जात आहेत,असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी(Savitribai Phule Pune University Vice Chancellor Dr. Suresh Gosavi)यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी 7 जून 2023 रोजी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. यानिमित्ताने डॉ. गोसावी यांनी 'एज्युवार्ता' शी संवाद साधला. डॉ. गोसावी म्हणाले, एक वर्षाच्या कार्यकाळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले असून शैक्षणिक उपक्रम, संशोधन आणि प्रशासकीय आघाड्यांवर वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी संशोधनाच्या गुणवत्तेत विद्यापीठ कुठेही मागे पडले नाही. लवकरच विद्यापीठात 111 प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिक हातभार लागणार आहे.

डॉ. गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंग मध्ये वाढ होत असून टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग मध्ये 2022 च्या तुलनेत 2023 च्या रँकिंग मध्ये चांगली वाढ झाली आहे. विद्यापीठ टाईम हायर रँकिंग मध्ये 801 ते 1000 च्या गटातून 601 ते 800 च्या गटात पोहोचले आहे. त्याचप्रमाणे qs वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंग मध्ये 2023 मध्ये 711 ते 720 च्या दरम्यान असणारे पुणे विद्यापीठ 2024 मध्ये 631 ते 640 च्या गटात पोहोचले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सुरुवात केली असून पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या ५० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना एनएपी बाबत कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्यामध्ये स्कूल कनेक्टच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. ऑन जॉब ट्रेनिंगचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी इंटर्नशीप पोर्टल सुरू केले असून त्यात सुमारे ३५० हून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली आहे.

(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या कार्यकाळाला  एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करताना विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.संजय किर्लोस्कर , डॉ.रघुनाथ माशेलकर, माजी कुलगुरू डॉ. नरेद्र जाधव आणि डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. विजय खरे )

विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले असून या ठिकाणी चालू शैक्षणिक वर्षापासून बीएससी डेटा सायन्स अभ्यासक्रम सुरू केला जात आहे, असे नमूद करून डॉ. गोसावी म्हणाले, विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये अधिकारी विद्यार्थी व विद्यार्थिनींना राहण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी विद्यापीठ आवारात नवीन वसतीगृहाचे काम सुरू आहे.तसेच राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी ८ कोटी 87 लाख रुपये एवढा निधी प्राप्त झाला असून इमारतीच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच संशोधक विद्यार्थ्यांसाठी दोन बहुमजली वसतिगृहे मंजूर करण्यात आली असून त्याचेही काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मुलींसाठी वसतिगृह बांधले जाणार आहे. केंद्र शासनाच्या मान्यतेने जैवतंत्रज्ञान विभागाकडून विद्यापीठ परिसरात जीनोम सिक्वेन्सिंग केंद्राची स्थापना करण्यास मान्यता मिळाली असून त्यासाठी 25 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. विद्यापीठाची पीएचडी. अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा साधारणपणे जुलै महिना अखेरीस घेण्याचे नियोजन आहे.सध्या रिक्त जागांची माहिती घेतली जात आहे.

 विद्यापीठात घडत असलेल्या अनुचित घटनांबाबत डॉ. गोसावी म्हणाले, विद्यापीठात घडणाऱ्या अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक पाऊले उचलली जात आहेत.तसेच काही गैरसमजातून घडलेल्या गोष्टींचे निराकरण करून विद्यापीठाचे कामकाज सुरळीतपणे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.नॅकला सामोरे जाण्यासाठी आवश्यक तयारी झाली असून नॅक मूल्यांकनात विद्यापीठ निश्चितच चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही गोसावी यांनी व्यक्त केला.