SPPU News : प्र-कुलगुरू निवडीला उरले काही तास; पूर्वीचे नाव मागे, नव्या नावांची चर्चा

पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड केली जाणार होती. परंतु, या बैठकीला राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांनी अचानक उपस्थिती लावली.

SPPU News : प्र-कुलगुरू निवडीला उरले काही तास; पूर्वीचे नाव मागे, नव्या नावांची चर्चा
SPPU Pro VC

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) प्र -कुलगुरू (Pro-Vice Chancellor) पदी कोण विराजमान होणार याबाबतचे गुढ पुढील काही तासांत उलगडणार आहे. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात (Maharashtra Politics) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) एन्ट्री झाली. त्याचा परिणाम विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू निवडीवरही झाला. त्यामुळे कुलगुरूंच्या (Vice Chancellor) नियुक्तीनंतर तब्बल ८१ दिवसांनी विद्यापीठाला नवीन प्र-कुलगुरू मिळणार आहेत. पूर्वी आघाडीवर असलेली काही नावे मागे पडली असून आता नवी नावे चर्चेत आली आहेत. मात्र, येत्या शनिवारी (दि.२६) या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.  

पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २२ जुलै रोजी झालेल्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड केली जाणार होती. परंतु, या बैठकीला राज्याच्या उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांनी अचानक उपस्थिती लावली. त्यामुळे बैठक सुरू होण्यापूर्वी चर्चेत असलेल्या नावाची घोषणा न करता इतर वादळी मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर ही बैठक संपली. विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. एम. जी. चासकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. अशोक चासकर आणि डॉ. विजय खरे यांची नावे त्यावेळी शर्यतीत होती. आता डॉ. खरे व डॉ. अशोक चासकर यांची नावे मागे पडली आहेत.

SPPU News : विद्यापीठाचे उपहारगृह अडकले लाल फितीत; व्यवस्थापन परिषद लक्ष देणार का?

दरम्यानच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटाने महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेत प्राचार्य म्हणून कार्यरत असणाऱ्या उमेदवारांच्या प्र-कुलगुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या. विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशास्त्राचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. चासकर यांच्याबरोबरच आता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या आणखी एका व्यक्तीचे नाव प्र-कुलगुरू पदाच्या शर्यतीत आले आहे. मात्र, कुलगुरू पदाच्या शर्यतीत असणारे डॉ. पराग काळकर यांचे नाव आघाडीवर असून माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे तसेच कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांचीही नावे प्र-कुलगुरू पदासाठी चर्चेत आली आहेत.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर प्र-कुलगुरू निवडीची घोषणा करण्याचा पूर्ण अधिकार कुलगुरूंना आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची ६ जून २०२३ रोजी निवड करण्यात आली. त्यानंतर ८-१५ दिवसांत कुलगुरू यांनी प्र-कुलगुरूंची नियुक्ती करणे अपेक्षित होते. परंतु, तब्बल ८१ दिवस ही निवड रखडली आहे. येत्या शनिवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक नियोजित आहे. तर शुक्रवारी (दि.२५) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची मुंबई येथे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. मुंबईहून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र-कुलगुरूंच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही तासांत या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo