सीओईपीने केलेले मेट्रो स्थानकांचे 'स्ट्रक्चरल ऑडिटिंग' वादात

आता ऑडिटवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने महाविद्यालयाने नव्याने ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीओईपीने केलेले मेट्रो स्थानकांचे  'स्ट्रक्चरल ऑडिटिंग' वादात
College of Engineering Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महामेट्रोने (Maha Metro) पुण्यात ठिकठिकाणी उभारलेल्या मेट्रो स्थानकांच्या स्ट्रॅक्चरल ऑडिटचा (Structural Audit) मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे ऑडिटचे काम मेट्रोकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला (COEP) दिले होते. त्यानंतर महाविद्यालयाने सेवेत नसलेल्या प्राध्यापकाकडून काम करून घेतले समजते. हे ऑडिट गृहित धरून मेट्रोला हिरवा कंदील मिळाला आहे. पण आता ऑडिटवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने महाविद्यालयाने नव्याने ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. (College of Engineering Pune News)

महामेर्टोकडून मेट्रो स्थानकांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. पण गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप, आनंदनगर आणि वनाज या स्थानकांच्या कामात त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणी काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक, इंजिनिअर शिरीष खासबारदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सिव्हिल, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले, हैदराबाद मेट्रो रेलचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

महामेट्रोनेही या त्रुटी मान्य केल्या आहेत. पण स्थानके सुरक्षित असल्याचा दावाही करण्यात केला जात आहे. त्यानंतर या त्रुटी महामेट्रोकडून दुरूस्तही करण्यात आल्या. काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोने ऑडिटचे काम सीआईपीला दिले. त्यासाठीही पैसेही दिले. महाविद्यालयाकडून ऑडिटचा अहवालही दिला. याच अहवालावरून वाद निर्माण झाला आहे. सीओईपीतील सहयोगी प्राध्यापक डॉ. ईश्वर सोनार यांनी हा अहवाल दिला आहे. स्थानके सुरक्षित असल्याचा दावा याच अहवालाच्या आधारे केला जात आहे.

सध्या सोनार हे महाविद्यालयात कार्यरत नाहीत. त्यांना २०१९ मध्येच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्याकडून ऑडिटचे काम कसे करून घेतला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत महामेट्रोलाही काही माहिती नाही. सीओईपीला ऑडिटचे काम दिले होते. पैसेही दिले आहेत. त्यांनी कुणाकडून काम करून घेतले, याबाबत माहिती नसल्याचे महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांच्याकडून माध्यमांना सांगितले जात आहे.

तर महाविद्यालयाचे कुलगुरू यांनी पुन्हा ऑडिट केले जाईल, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, ईश्वर सोनार यांनी मेट्रो स्थानकांचे ऑडिट केले आहे. त्यांनी बडतर्फीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सोनार हे सध्या सेवेत नसले, तरी अभ्यागत प्राध्यापक आहेत. त्यांनी दिलेल्या अहवालात काही त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही नव्याने प्राध्यापकांच्या एका गटामार्फत ऑडिट करू, असे महाविद्यालयाचे कुलगुरू मुकुल सुतवणे यांनी सांगितले.