प्राध्यापक भरती गैरव्यवहारावर अध्यक्ष नंदकुमार झावरे यांचा प्रथमच खुलासा ; अविश्वासदर्शक ठराव आणताच येत नाही

प्राध्यापक भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही.तसेच संस्थेच्या घटनेत अध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्याची तरतूदच नाही.

प्राध्यापक भरती  गैरव्यवहारावर अध्यक्ष नंदकुमार झावरे यांचा प्रथमच  खुलासा ; अविश्वासदर्शक ठराव आणताच  येत नाही
Nandkumar Jhavre

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

"अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ( Ahmadnagar District Maratha Vidya Prasarak Samaj) ही १०० वर्षाहून अधिक जुनी संस्था असून संस्थेची उज्वल परंपरा अजूनही कायम आहे. या संस्थेत प्राध्यापक भरती (Faculty recruitment ) प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. तसेच संस्थेच्या घटनेत अध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक ठराव आणण्याची तरतूदच नसल्यामुळे संचालक मंडळाने मतदान घेऊन केलेल्या कार्यवाहीला कायदेशीर आधार राहत नाही ", अशी माहिती अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे (Ahmednagar District Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha President Nand Kumar Zawre) यांनी 'एज्युवार्ता'शी संवाद साधताना सांगितले.

हेही वाचा : शिक्षण प्राध्यापक भरतीत गैरव्यवहार ; संस्थेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक ठराव

   अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या प्राध्यापक भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्या संदर्भातील तक्रार सावित्रीबाई फुळे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे देण्यात आली. तसेच संस्थेच्या संचालक मंडळापैकी काही संचालकांनी थेट अध्यक्षांविरोधातच उभे ठाकत मतदान घेऊन त्यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ही एक विश्वस्त संस्था आहे. इतर संस्थांप्रमाणे या संस्थेच्या अध्यक्षांवर अविश्वासदर्शक ठराव आणता येत नाही,असा दावा नंदकुमार झावरे यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना केला.तसेच धर्मदाय आयुक्त यांनी संचालक मंडळातील सदस्यांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 प्राध्यापक भरती बाबत बोलताना झावरे म्हणाले, शासन व विद्यापीठ नियमावलीप्रमाणे सर्व उमेदवारांच्या मुलाखती पारदर्शकप पध्दतीने घेण्यात आल्या आहेत. अर्ज केलेल्या २ हजार ९०० उमेदवारांपैकी केवळ ९३६ उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. या उमेदवारांच्या मुलाखती पारदर्शक पद्धतीने घेण्यात आल्या. त्यासाठी विषयतज्ज्ञ, विद्यापीठाच्या कुलगुरूंचे प्रतिनिधी , रिझर्वेशन नॉमिनी आणि पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली.   प्राध्यापक पदासाठी पात्र असणाऱ्या गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड करण्यात आली. संस्थेचा अध्यक्ष म्हणून आम्हाला सर्व प्रक्रिया व्यवस्थित होते आहे किंवा नाही एवढेच पाहण्याचा अधिकार होता. त्यानुसार आम्ही फक्त सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे व्हावी,याची खबरदारी घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखती होतात तशाच पद्धतीने या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यात कोणताही गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही, असेही झावरे यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.