आयएएस दाम्पत्याच्या मुलीची मंत्रालयासमोरच्या बिल्डिंगवरुन उडी घेत आत्महत्या; कारण...

आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. याशिवाय त्यांच्या मुलीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

आयएएस दाम्पत्याच्या मुलीची मंत्रालयासमोरच्या बिल्डिंगवरुन उडी घेत आत्महत्या; कारण...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबईमध्ये आयएएस (IAS) दाम्पत्याच्या २७ वर्षीय मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आयएएस विकास रस्तोगी (Vikas Rastogi) आणि राधिका रस्तोगी (Radhika Rastogi) या आयएएस दाम्पत्याच्या लिपी रस्तोगी या मुलीने ही आत्महत्या केली आहे. ही घटना पहाटे चार वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.   

मंत्रालयासमोरच राहत असल्याने लिपी रस्तोगी हिने राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शिवाय ज्या इमारतीत ही घटना घडली तिथं आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. विकास रस्तोगी हे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत. ते १९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. तर राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव पदावर कार्यरत आहेत. लिपी रस्तोगी ही हरियाणातील सोनिपत येथे वकिलीचं शिक्षण घेत होती. लिपी ही अभ्यासात तितकीशी पुढे नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात होती. आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही अशी भीती लिपीला सतावत होती आणि त्यातूनच तिने हे पाऊल उचलले असणार अशी चर्चा सुरू आहे.  

दरम्यान, लिपी हिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असं स्पष्ट म्हटलं आहे.त्यामुळे कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.