विकसित भारत अभियानासाठी उच्च शिक्षण विभागाने योगदान महत्त्वाचे : डॉ. शैलेंद्र देवळाणकर  

आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत सांख्यिकी विभागाने सर्वेक्षणात महाविद्यालय, विद्यापीठांची माहिती अचूक भरून अभियान यशस्वीपणे राबावावे.

विकसित भारत अभियानासाठी उच्च शिक्षण विभागाने योगदान महत्त्वाचे : डॉ. शैलेंद्र देवळाणकर  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत (Ministry of Human Resource Development of Central Govt)आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम (All India Higher Education Survey Programme)हा अतिशय महत्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पाअंतर्गत देशातील उच्च शिक्षण विभाग एका छताखाली आणण्यासाठी मदत होईल.हा  सर्वेक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समूह गटात काम करणे गरजेचे आहे.केंद्र शासनाने विकसित भारतासाठी 25 वर्षांचा आराखडा तयार केला आहे. हे सर्वेक्षणही त्याचाच भाग असून विकसित भारत अभियान यशस्वी करण्यासाठी  उच्च शिक्षण विभागाने योगदान देणे महत्त्वाचे आहे,असे मत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर (Director of Higher Education Dr. Shailendra Devlankar)यांनी व्यक्त केले. 

उच्च शिक्षण संचालनालयाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व काही निवडक महाविद्यालये यांच्यासाठी अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी देवळाणकर बोलत होते. कार्यक्रमाला  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे सहाय्यक संचालक सौरभ कांत,  वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी शुभदा शर्मा, प्रोग्रामर शिवम पांडे, सांख्यिकी अधिकारी स्वप्नील कोराडे आदी उपस्थित होते. 

देवळाणकर म्हणाले, आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत सांख्यिकी विभागाने सर्वेक्षणात महाविद्यालय, विद्यापीठांची माहिती अचूक भरून अभियान यशस्वीपणे राबावावे.उच्च शिक्षण सर्वेक्षण देशाच्या शैक्षणिक नियोजनासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. राज्यात ४५ लाख विद्यार्थी आणि ८४ विद्यापीठे आहेत. सर्व ठिकाणची माहिती अचूक असावी, त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक काम करावे. देशातील अन्य राज्यांनी उदाहरण म्हणून आपल्या राज्याकडे पाहिले पाहिजे.

कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. माहिती संकलित करण्याचे काम खूप अवघड असून जास्तीत जास्त अचूक माहिती संकलित करण्यात यावी. नवीन धोरण आणि पुढच्या गोष्टीचे नियोजन करण्यासाठी अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणातील माहिती खूप महत्त्वाची आहे.

 कांत म्हणाले, मागील वर्षात सर्वेक्षणाचे १०० टक्के उद्दिष्ठ साध्य केले आहे. यावर्षीही आपण सर्व मिळून उद्दिष्ट साध्य करूया. सर्वेक्षण महाविद्यालये आणि शिक्षकांच्या संख्येवर अवलंबून असल्याने माहिती भरतांना होणाऱ्या चुका टाळाव्या लागतील. कोणाला काही शंका असल्यास त्यांनी निरसन करून घ्यावे. माहितीत गुणवत्ता आणि अचुकता असणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.