कुलसचिव पदी कोणाची लागणार वर्णी; कोणत्या उमेदवारांनी केले अर्ज 

पूर्णवेळ कुलसचिव पदी कोण विराजमान होणार हे लोकसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

कुलसचिव पदी कोणाची लागणार वर्णी; कोणत्या उमेदवारांनी केले अर्ज 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलसचिव (Registrar)पदासाठी 35 हून अधिक उमेदवार इच्छुक असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये माजी व्यवस्थापन परिषद सदस्यांसह , माजी आधिसभा सदस्यांचाही समावेश आहे.तसेच विद्यापीठातील विभागात कार्यरत असणाऱ्या काही विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी सुद्धा कुलसचिव पदासाठी अर्ज (Application for the post of Registrar)केला आहे.त्यामुळे कुलसचिव पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.मात्र, पूर्णवेळ कुलसचिव पदी कोण विराजमान होणार हे लोकसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे प्रभारी कुलसचिव पद विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक आणि संरक्षण व सामारीक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे यांच्याकडे आहे.विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर रिक्त झालेल्या कुलसचिव पदाचा भार डॉ.खरे यांच्याकडे देण्यात आला.मात्र, प्राध्यापक , अधिष्ठाता पदाबरोबरच विद्यापीठातर्फे कुलसचिव पद भरतीची जाहिरात देण्यात आली.विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत विद्यापीठाकडे 36 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 20 ते 22 अर्ज पुणे जिलह्यातील उमेदवारांचे असून उर्वरित अर्ज नाशिक, अहमदनगर,मुंबई व कोल्हापूर येथील आहेत.तसेच अर्ज करण्यात महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. 

हेही वाचा: विद्यापीठाने घसरलेले NIRF रँकिंग पुन्हा मिळवावे : प्रकाश जावडेकरांची अपेक्षा

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या माजी सदस्या व प्राचार्या शर्मिला चौधरी, माजी आधीसभा सदस्य राजकुमार शेटे यांच्यासह किवळे येथील सिंबायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हार्सिटीचे सुधाकर शिंदे, हर्ष गायकवाड, मनोहर सानप, संजय सानप, पंडित राधाकृष्ण, मिलिंद सूर्यवंशी,हेमांगिनी पाटील, महेश देशपांडे,सुनील कांदळकर, भारत जिंतुरकर, पंढरीनाथ पाटील, कैलास चंद्रात्रे, राजूसिंग चव्हाण, दिनेश डोके, तानाजी दवडे, संजयकुमार गांगुर्डे, सुगत बनसोडे, वंदना निकम, महादेव कोकाटे, जितेंद्र भोसले, नंदकुमार मंडलिक, सुनील म्हस्के , मान्द्य गुलाल, प्रसाद बाविस्कर, अमोल बापट, प्रशांत वानखडे, ज्योती भाकरे, बाळासाहेब आगरकर, वर्षा वानखडे, संध्या चव्हाण, कैलास सापनर, नानासाहेब साठे,अश्विनीकुमार सोनोने यांनी कुलसचिव पदासाठी अर्ज केला आहे.तसेच  विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे यांनीही पूर्णवेळ कुलसचिव पदासाठी अर्ज केल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडूकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे.त्यामुळे विद्यापीठाच्या प्राध्यापक , अधिष्ठाता व  कुलसचिव पदाच्या मुलाखती आचारसंहिता संपल्यावर अर्थात लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.