आधार नोंदणी पोर्टलचा घोळ अन् सुट्ट्यांनी वाढवलं शाळांचं टेन्शन !

आधार अपडेशनमध्ये पुणे जिल्हा सर्वाधिक मागे आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांकडून शाळांवर काम वेगाने करण्याचा आग्रह धरला जात आहे.

आधार नोंदणी पोर्टलचा घोळ अन् सुट्ट्यांनी वाढवलं शाळांचं टेन्शन !
Aadhar Updation

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांच्या आधार वैधतेचे (Aadhaar Updation) किमान ९५ टक्के काम ३० एप्रिलपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश सर्व शाळांना (Schools) देण्यात आले आहेत. हे टार्गेट पूर्ण न झाल्यास संबंधित शाळांचे वेतन (Salary) दिले जाणार नाही. तसेच संचमान्यतेमध्येही अडचणी येणार आहेत. पण असे असले तरी प्रत्यक्षात आधार नोंदणीच्या पोर्टलचा तांत्रिक घोळ (Website Hang) अजूनही सुरूच आहे. त्यात तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने आता शिक्षण विभागाचे (Education Department) कामकाज ठप्प राहणार असल्याने शाळांचे टेन्शन वाढले आहे.

आधार अपडेशनमध्ये पुणे जिल्हा सर्वाधिक मागे आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांकडून शाळांवर काम वेगाने करण्याचा आग्रह धरला जात आहे. याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी ज्या शाळांचे आधार वैधतेचे काम ९५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा शाळांचे वेतन पुढील आदेशापर्यंत अदा करू नयेत, असे आदेश काढले आहेत. या आदेशाला शिक्षकांकडून जोरदार विरोध केला जात आहे.

हेही वाचा : बोगस शाळा : माजी शिक्षक अन् अधिकाऱ्यांनीच घातला संस्थाचालकांना गंडा !

शिक्षण विभागाच्या पोर्टलवरून आधार वैधतेचे कामकाज सुरू आहे. शाळांनी विद्यार्थ्यांच्या आधारची माहिती भरल्यानंतर पुढे पडताळणी केली जाते. पण यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे खूप विलंब लागत आहे. परिणामी, हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यातच आता पुढील तीन दिवस सुट्ट्या आहेत. शुक्रवारपासून लोणावळा येथे शिक्षण विभागाच्या कार्यशाळेमध्ये सर्व अधिकारी असतील. त्यामुळे याबाबतीत कोणताही ठोस निर्णय होणे धुसर आहे. त्याचा फटका अपडेशनच्या कामाला बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

जवळपास दोन टक्के मुलांकडे आधार कार्ड नाही. तर सरल आणि आधार डाटामधील माहिती न जुळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दहा टक्के आहे. UIDAI नुसार १३.२१ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अवैध तर ७६.७६ टक्के विद्यार्थ्यांचे आधार वैध आढळून आले आहे. सरल आणि आधार डाटा जुळून नसल्याने २१ लाख ६ हजार ६०७ विद्यार्थ्यांची माहिती UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेली नाही. ही माहिती शाळेने दुरूस्त करायची आहे.

हेही वाचा : मुलांनो, उन्हाळी सुट्टी अशी लावा सार्थकी..डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितल्या या महत्वाच्या टिप्स!

याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले (Mahendra Ganpule) म्हणाले, किमान ९५ टक्के आधार अपडेटचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. पण संकेतस्थळ अनेकदा सुरू होत नाही. अनेक विद्यार्थ्यांची आधार कार्ड नाहीत. पडताळणी पूर्ण होत नाही. त्यातच पुढील तीन दिवस सुट्ट्या आहेत. दोन दिवस लोणावळ्यामध्ये कार्यशाळा असल्याने सर्व अधिकारी तिथे असतील. शिक्षण विभागाने ३० एप्रिल अंतिम मुदत दिली असली तरी सुट्ट्यांमध्ये काम पूर्ण होण्यात अडचणी येतील. त्यामुळे थेट दोन मे रोजी याचा आढावा घेतला जाईल. त्यावरच संच मान्यता आणि आमचे वेतनही अवलंबून आहे.    

शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार -

शाळेकडील चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असलेले एकूण विद्यार्थी – २ कोटी १३ लाक ८९ हजार ३५०

आधार कार्डची माहिती शाळेने स्टुडंट पोर्टलमध्ये नोंद न केलेले विद्यार्थी – ३ लाख ९३ हजार ६७३

आधार कार्डची माहिती स्टुडंट पोर्टलवर नोंद केलेले विद्यार्थी – २ कोटी ९ लाख ९५ हजार ६७७

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेली विद्यार्थ्यांची संख्या – १ कोटी ८८ लाख ८९ हजार ७०

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध आढळून आलेले विद्यार्थी – १ कोटी ६१ लाख १६ हजार १३१

UIDAI कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध आढळून आलेले विद्यार्थी – २७ लाख ७२ हजार ९३९