दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट

निकाल जाहीर करण्यापूर्वीच राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे पुण्यासह राज्यातील प्रमुख महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमधील प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जातात.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट
FYJC Admission process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह (SSC Board) इतर सर्व मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा (Examination) संपल्या आहेत. विद्यार्थ्यांना निकालाचे आणि इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश (11th Admission) घेऊन कॉलेजमध्ये जाण्याचे वेध लागले आहेत. दहावीचा निकाल (10th Result) जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली जाते. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरून घेण्यास सुरुवात करण्याचा शिक्षण विभागाचा (Education Department) प्रयत्न आहे. (FYJC Admission News)

राज्य मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली. सध्या निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, निकाल जाहीर करण्यापूर्वीच राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे पुण्यासह राज्यातील प्रमुख महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमधील प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जातात. त्यासाठी प्रवेश अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरून घेतला जातो. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती तर दुसऱ्या भागात कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंती क्रमांक भरावे लागतात.

हेही वाचा : ‘ब्ल्यू बेल्स’ शाळेला दणका; विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्याचे आदेश

खरे तर अकरावी प्रवेश प्रक्रियेस आत्तापर्यंत सुरुवात व्हायला हवी होती. मात्र प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी यापूर्वी नियुक्ती केलेल्या एजन्सीचा कालावधी येत्या ३० जून रोजी संपुष्टात येणार आहे. या एजन्सीला मुदतवाढ द्यायची की नवीन समिती नियुक्त करायची, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु, पुढच्या आठवड्यात यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

''इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन समितीची मान्यता घ्यावी लागते. पुढील आठवड्यात या समितीची बैठक होणार आहे. त्यात पूर्वी काम करत असलेल्या एजन्सीलाच अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी मुदतवाढ द्यायची की दुसऱ्या एजन्सीला काम द्यायचे याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.''       

- कृष्णकुमार पाटील, संचालक, माध्यमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य