एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता द्यावी लागणार सीईटी परीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये जे उमेदवार एम.एचएमसीटी इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमास प्रवेश घेणार आहेत, अशा उमेदवारांकरीता सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे.

एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता द्यावी लागणार सीईटी परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) पासून एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड अर्थात हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या (M. HMCT Integrated Syllabus) प्रवेशासाठी महा- एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड सीईटी (Maha. M. HMCT Integrated CET) ही सामाईक प्रवेश परीक्षा लागू करण्यात आली (Common Entrance Test was introduced) आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये जे उमेदवार एम.एचएमसीटी इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमास प्रवेश घेणार आहेत,अशा उमेदवारांकरीता सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. याची सर्व संबंधित उमेदवार/पालक/संस्थांनी नोंद घ्यावी, असे सीईटी सेलकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

महा- एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड सीईटी २०२४ या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी येत्या ९ मे पासून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम  मुदत १५ मे पर्यंत आहे. सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर https://cetcell.mahacet.org/ ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्जाची निश्चिती करावी लागणार आहे. 

महा- एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड सीईटी या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच महा- एम. एचएमसीईटी सीईटी २०२४ या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला अभ्यासक्रम एम. एचएमसीटी इंटिग्रेटेड या सामाईक प्रवेश परीक्षेकरीता लागू राहील, याची सर्व संबंधित उमेदवार/पालक/ संबंधित संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.

महा-बी.एचएमसीटी सीईटी २०२४ या प्रवेश परीक्षेकरीता अर्ज केलेले उमेदवार एम.एचएमसीटी इंटिग्रेटेड या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता पात्र राहतील. महा-बी.एचएमसीटी सीईटी २०२४ आणि एम. एचएमसीटी इंटिग्रेटेड सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा येत्या  २४ मे  २०२४ रोजी घेण्यात येणारआहे.