विद्यार्थ्याने लिहिले कुलगुरूंना आत्महत्येचे पत्र...

मी नैराश्याचा सामना करत असून वसतिगृह मिळाले नाही तर आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही" , अशा आशयाचे पत्र विद्यापीठातील 'पीएचडी' च्या विद्यार्थ्यांने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांना लिहिले आहे.

विद्यार्थ्याने लिहिले कुलगुरूंना आत्महत्येचे पत्र...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाचे कर्मचारी व अधिकारी त्रास देत असून त्यांच्या त्रासाला कंटाळून माझ्याकडून चुकीचे पाऊल उचलले गेले आणि त्यामुळे माझा मृत्यू झाला तर त्याला वसतिगृहातील लोकं जबाबदार असतील.वसतिगृहासाठी संघर्ष करायला लागणे हे खूप भयानक आहे. मी नैराश्याचा सामना करत असून वसतिगृह मिळाले नाही तर आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही" , अशा आशयाचे पत्र विद्यापीठातील 'पीएचडी' च्या विद्यार्थ्यांने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांना लिहिले आहे.

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करून घरी परत जावे लागले आहे. सध्या विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक पाचच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृह देणे शक्य नाही. प्रवेश घेणारे विद्यार्थी व वसतिगृहातील जागा यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. त्यामुळे विद्यापीठातील प्रत्येक विभागाला वसतिगृहाच्या मर्यादित जागा विभागून देण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ वसतिगृह मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यात वसतिगृह कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात असून अक्षय सुरवसे या विद्यार्थ्यांने तर थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे.

 अक्षय सुरवसे म्हणाला, वस्तीगृह क्रमांक ९ मध्ये अनेक खोल्या रिकाम्या असताना विद्यार्थ्यांना या खोल्या उपलब्ध करून दिला जात नाहीत. मी सध्या मराठी विभागात पीएच.डी. अंतर्गत संशोधन करत आहे. केटरिंगसह मिळेल ती बाहेरची कामे करून मी माझे शिक्षण आणि रोजचा खर्च भागवत आहे. आई वडील मजूर असल्याने त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळू शकत नाही. विद्यापीठाबाहेर राहून संशोधन करणे मला शक्य नाही.मात्र, त्रास देऊन आम्हा विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढले जात आहे.या तणावातून काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका येऊन गेला. विद्यापीठाने वसतिगृह क्रमांक पाचचे दुरुस्तीचे काम होईपर्यंत मला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पूर्ते वसतिगृह उपलब्ध करून द्यावे. सहा महिन्यानंतर वसतिगृहात जागा शिल्लक नसल्यास माझा वसतिगृहात प्रवेश रद्द केला जाईल, असे अंडरटेकिंग घ्यावे.

------ 

विद्यापीठ प्रशासनाचे अपयश...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह उपलब्ध करून द्यावे लागते, याची विद्यापीठ प्रशासनाला जाणीव आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वसतिगृहाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, दरवर्षी विद्यापीठाच्या वसतिगृह दुरुस्तीच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांना विद्यापीठातील प्रवेशापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळेच विद्यार्थी आत्महत्येच्या विचारापर्यंत येत आहेत.