CBSE बोर्डात होणार मोठे बदल ! १०वी १२वी च्या विद्यार्थांना अतिरिक्त भाषा विषय 

दहावीच्या विद्यार्थ्यांना ५ ऐवजी १० विषयांचे पेपर द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता  १२ वी मध्ये विद्यार्थ्यांना ५ ऐवजी ६ विषय उत्तीर्ण करावे लागणार आहेत.

CBSE बोर्डात होणार मोठे बदल ! १०वी १२वी च्या विद्यार्थांना अतिरिक्त भाषा विषय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मोठ्या बदलांच्या तयारीत आहे. सीबीएसईने एक प्रस्ताव तयार केला असून त्यानुसार इयत्ता १० (Secondary Education) आणि १२वीच्या शैक्षणिक (Higher Secondary Education) रचनेत मोठे बदल केले जाणार आहेत.दहावीच्या विद्यार्थ्यांना ५ ऐवजी १० विषयांचे पेपर द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता  १२ वी मध्ये विद्यार्थ्यांना ५ ऐवजी ६ विषय उत्तीर्ण करावे लागणार आहेत.

शालेय शिक्षणात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू करणे हा या बदलाचा उद्देश असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. या प्रस्तावाबाबत शाळाप्रमुख आणि शिक्षकांकडून अभिप्राय घेतला होता. सर्वांकडून सकारात्मक आणि अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. सर्व शिक्षकांच्या प्रतिसादात शिकवण्याची स्वायत्तता देखील अधोरेखित झाली आहे. अशा परिस्थितीत सीबीएसईने सर्व बाबींचा विचार करून प्रस्तावाला अंतिम रूप दिले आहे.

CBSC च्या प्रस्तावानुसार आता १० वीच्या (10th Class) विद्यार्थ्यांना २ ऐवजी ३ भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यात किमान २ स्थानिक भाषा असाव्यात. या शिवाय  दहावीमध्ये सात विषय जोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यात गणित आणि कंप्यूटेशन थिंकिंग, सामाजिक विज्ञान, विज्ञान, कला शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे. 3 भाषा, गणित आणि संगणकीय विचारसरणी, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे बाह्य मूल्यमापन केले जाईल. इतर ३ विषयांचे मुल्यांकन अंतर्गत आणि बाह्य दोन्ही पद्धतीने केले जाईल. महत्वाचे म्हणजे  या सर्व १० विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व १० विषय उत्तीर्ण करावे लागतील. यापेक्षा कमी विषयात उत्तीर्ण उमेदवारांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार नाही. 

इयत्ता १२ वीसाठी प्रस्तावित केलेल्या बदलांमध्ये विद्यार्थ्यांना आता १ ऐवजी २ भाषांचा अभ्यास करावा लागेल. यामध्ये किमान १ भाषा ही मूळ भारतीय भाषा असावी.  तसेच विद्यार्थ्यांना १२ वी मध्ये ५ ऐवजी ६ विषयात परीक्षा द्यावी लागेल. ६ विषयांमध्ये २ भाषा आणि ४ इतर विषय असतील.  आणखी एक बदल म्हणजे CBSE च्या योजनेनुसार, आता एका  शैक्षणिक वर्षात अंदाजे १२०० तास अध्यापन करावे लागणार आहे, यामुळे ४० क्रेडिट्स मिळविण्यात मदत होईल. प्रत्येक विषयासाठी तासांची निश्चित संख्या दिली जाईल आणि चांगले निकाल मिळविण्यासाठी सरासरी विद्यार्थ्याला वर्षभरात १२०० तास शाळेत घालवावे लागतील. मात्र ही नवीन प्रणाली कोणत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.