टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर; उत्तरपत्रिकेच्या पुर्नमुल्यांकनास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत 

शासकीय संगणक टायपिंग मराठी, हिंदी व  इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि. विषयाच्या परीक्षेचा निकाल २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर;  उत्तरपत्रिकेच्या पुर्नमुल्यांकनास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (Maharashtra State Examination Council) विभागाच्या वतीने जुलै २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या  शासकीय संगणक टायपिंग मराठी, हिंदी व  इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि. विषयाच्या परीक्षेचा निकाल (Typing Exam Result ) २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून १० दिवसात विद्यार्थ्याला गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी आणि पुर्नमुल्यांकनासाठी (For marking and photocopies of answer sheets and for revaluation ) अर्ज करता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले. 

हेही वाचा : शिक्षण ऑनलाईन व दुरस्थ अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताय..मग ही काळजी घ्या! युजीसीने केले सतर्क

टायपिंग परीक्षेचा निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून  विद्यार्थ्यांना गुणपत्रकेची ऑनलाईन प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्याची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधीत संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे १०० जीएसएम कागदावर करून विद्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच संबंधीत विद्यार्थ्यांस सॉफ्टकॉपी पीडीएफ स्वरुपात देण्यात यावी, जेणे करून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार  छपाई करुन घेता येईल. संस्थांनी संबंधीत विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र, गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी प्रति विषय रुपये १०० प्रमाणे व छायाप्रत मिळण्यासाठी प्रति विषय रूपये ४०० प्रमाणे रक्कम ऑनलाईन पद्धतीने  ३० सप्टेंबरपर्यंत भरता येईल. तसेच गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयात पाच दिवसात पुर्नमुल्यांकनासाठी प्रती विषय रुपये ६०० प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने  रक्कम भरुन अर्ज करावेत, यानंतर आलेल्या अजांचा विचार केला जाणार नाही.,असेही ओक यांनी स्पष्ट केले.