CBSE च्या प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारीपासून; मार्गदर्शक सूचना जाहीर

प्रात्यक्षिक परीक्षांसाठी, सर्व शाळांना या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील.

CBSE च्या प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारीपासून; मार्गदर्शक सूचना जाहीर
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  (CBSE) इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरु होणार असून सीबीएससीने प्रात्यक्षिक परीक्षाच्या (Practical Examinations ) मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत.  येत्या १ जानेवारी 2024 पासून CBSE  बोर्डाच्या  दहावी आणि बारावीच्या  प्रात्यक्षिक परीक्षा  सुरु होणार आहेत. 

सीबीएसई बोर्डाने सर्व शाळांना प्रात्यक्षिक परीक्षांबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षांसाठी, सर्व शाळांना या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील, अशा सूचना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.
सीबीएसईने सर्व शाळांना प्रात्यक्षिक परीक्षेशी संबंधित सर्व आवश्यक गोष्टी आणि पायाभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच प्रॅक्टिकलसाठी आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेशही दिले आहेत. याशिवाय सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना परीक्षांबाबत माहिती देण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत, जेणेकरून त्यांना परीक्षांची आगाऊ तयारी करता येईल. अपंग विद्यार्थ्यांसाठी, शाळांना या विद्यार्थ्यांसाठी योग्य रचना तयार करण्याचे आणि परीक्षेसाठी आवश्यक सुविधा व गोष्टी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 CBSE बोर्डाने परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार  CBSE बोर्डाच्या इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षा १९ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२४ या कालावधीत घेतल्या जातील. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.