डिसले गुरूजी प्रस्ताव देतात पण सरकार काहीच करत नाही?

नुकतेच ते अमेरिकेला एका संशोधनासाठी गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी सचिव व आयुक्तांची भेट घेतली होती. ‘नेक्स्ट जनरेशन एज्युकेशन’ असा तो प्रस्ताव होता. पण त्यावर पुढे काय झाले, याची माहिती खुद्द डिसले गुरूजींनाही नाही.

डिसले गुरूजी प्रस्ताव देतात पण सरकार काहीच करत नाही?
Global Teacher Ranjitsinh Disale

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ग्लोबल गुरूजी म्हणून रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांची महाराष्ट्राला ओळख. ग्लोबल टीचर्स पुरस्कार (Global Teachers Award) मिळाल्यानंतर त्यांना जगभरात प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर मागील वर्षी ते अमेरिकेत (America) संशोधनासाठी काही महिने राहिले. तिथून परत येताच त्यांनी पहिल्या दिवशी राज्याचे शिक्षण (Education) सचिव व शिक्षण आयुक्तांची भेट घेतली. त्यांना भेटून विविध योजनांचा एक प्रस्तावही दिला. पण चार महिने उलटले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याआधी त्यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनाही शिक्षकांसाठी ‘सुपर ३०’ (Super 30) ची कल्पना सुचविली होती. त्याकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. (Ranjitsinh Disale News)  

डिसले गुरूजींनी नुकतीच एका यु ट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी शिक्षणपध्दतीतील बदल, तंत्रज्ञानचा वापर, शिक्षकांचे प्रशिक्षण, अध्यापन व अध्ययनाचे बदलते स्वरुप अशा विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. डिसले आणि शिक्षण विभागामध्ये यापूर्वी अनेक वाद निर्माण झाले होते. त्यांच्या बडतर्फीच्या चर्चाही शिक्षण विभागातून बाहेर येत होत्या. पण अखेर या वादावर पडदा पडला. नुकतेच ते अमेरिकेला एका संशोधनासाठी गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी सचिव व आयुक्तांची भेट घेतली होती. ‘नेक्स्ट जनरेशन एज्युकेशन’ असा तो प्रस्ताव होता. पण त्यावर पुढे काय झाले, याची माहिती खुद्द डिसले गुरूजींनाही नाही. 

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

याविषयी सांगताना ते म्हणाले, मी अमेरिकेतून आल्यानंतर पहिल्या दिवशी शिक्षण सचिव आणि आयुक्तांना भेटलो. जर बदल करायचे असतील तर या दोन जणांच्या निर्णय क्षमतेवरच होणार आहेत. परदेशात असतानाच मी महाराष्ट्रासाठी प्लॅन तयार करत होतो. मी काही वरवरचे त्यांना सांगितले नाही. सहा-सात एरिया निवडले, ज्यावर आपल्याला काम करावे लागेल. शिक्षकांच्या क्षमतावृध्दी मुलांसाठी भविष्यातील योजना, प्रशासन म्हणून करायच्या उपाययोजना अशा घटकांवर मी त्यांना काही कल्पना दिल्या. नेक्स्ट जनरेशन एज्युकेशन असे मी त्याला म्हटले होते.

शिक्षकांना आपण प्रशिक्षण देतो, पण आपल्याकडे प्रशिक्षण केंद्रच नाहीत. सध्या कोणती तरी शाळा निवडून तिथे तासभर-दोन तास प्रशिक्षण दिले जाते. हे बदलून जिल्हा स्तरावर प्रशिक्षण केंद्र हवे. तिथे एक स्वतंत्र टीम असेल. शिक्षणामध्ये सीएसआरच्या माध्यमातून मोठा पैसा खर्च होतोय, पीपीपीच्या पैशातून अडचणी सोडवायला हवे. कंपन्यांकडे पैसा आहे, पण कुणाला द्यायचा हे समजत नाही. मी १२ डिसेंबरला दोघांना भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. त्याचे पुढे काय झाले, हे माहिती नाही. मला जे जाणवले, ते त्यांच्यापर्यंत पोहचवले, असे डिसले यांनी सांगितले.

हेही वाचा : सुट्टीचा मुक्त आनंद घ्यायचाय.. मग हा लेख वाचाच

ग्लोबल टीचर्स पुरस्कार मिळाल्यानंतर मुश्रीफ आणि डिसले गुरूंजीची भेट झाली. याविषयीचा किस्सा सांगताना ते म्हणाले, सुपर ३० टिचर्स ही कल्पना मी ग्रामविकास विभागाला मागील वर्षी दिली होती. हसन मुश्रीफ त्यावेळी मंत्री होते. एका कार्यक्रमात ते मला म्हणाले की, ‘गुरूजी तुम्ही राज्याला काय देऊ शकता.’ त्यावर मी म्हणालो की, माझ्यासारख्या अनेक शिक्षकांचा शोध घेईन आणि त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देईन. त्यानुसार त्यांना सुपर ३० चा प्रस्ताव दिला. राज्यातील ३० शिक्षक मला द्या, मी एक वर्षभर प्रशिक्षण देईल. यांच्याकडे बघून पुढचे ३० तयार होतील, असे त्यात म्हटले होते. यातील दोन जरी झळकले तरी मोठी योगदान असेल. रंजित डिसले हा ग्लोबल पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय असला तरी तो एकमेव ठरू नये. त्यासाठी या लोकांना तिथपर्यंत न्यायला हवे. शिक्षकांमध्ये क्षमता आहे. फक्त ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कसे मांडले गेले पाहिजे, हे माहिती नसते, असे डिसले गुरूजींनी सांगितले.

माध्यमांमध्ये शिक्षणाकडे दुर्लक्ष

प्रसारमाध्यमांमध्ये शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची नाराजी डिसले गुरूजींनी व्यक्त केली. ते म्हणाले,  ३६५ दिवसांचे वृत्तपत्र घ्या किंवा ३६५ दिवसांतील वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ऐका. त्यामध्ये पाच किंवा दहा दिवसही आपण शिक्षणाला देत नाही. आपल्या समाजाला शिक्षण हा तितक्या गांभीर्याने घ्यायचा विषय वाटत नाही, हे यातून दिसते. बजेटमध्येही शिक्षणाला किती प्राधान्य दिले जाते हे पाहा. आपल्याकडे शिक्षणाला प्राधान्य नाही. परदेशामध्ये याउलट चित्र आहे. प्रसारमाध्यमांवरील चर्चा समाजमन तयार होईल, यासाठी पुरेशा नाहीत. कुणाला तरी ग्लोबल टिचर्स पुरस्कार मिळाला म्हणून दहा दिवस चालविले जाते. एकट्या रंजित डिसलेच्या वाट्याला नको. असे अनेकजण आहेत. त्यांना समोर आणालया हवे.

अपयश खूप शिकवते

मी २००९ पासून काम करत होतो. त्या व्यासपीठावर अनेक वर्ष असल्याने मला ते समजत गेले. अपयशाची किंमत मी चुकवली आहे. आतापर्यंत मी पाच ते आठ लाख रुपये माझ्या अपयशावर खर्च केले आहेत. अपयशाने मला घडवले आहे. यशाने मी फारसे शिकलोच नाही. क्युआर कोडच्या प्रयोगाआधी मी काही प्रयोग करत होतो. ते फेल गेले. एससीईआरटीमध्ये मायक्रोसॉफ्टचा करारानुसार मी प्रशिक्षण घेतले होते. ग्लोबल टिचर्स पुरस्कारावेळी माझा तिसऱ्यांदा सहभाग होता. त्याआधी दोनदा अपयश आले. अपयश खूप शिकवते, असे डिसले गुरूजींनी नमूद केले.