MPSC च्या रखडलेल्या परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर करा : रविकांत तुपकर 

वनपरिक्षेत्र अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या पदांचा आकडा अनुक्रमे २७२ वरुन ११ व ९९७ वरुन २६ पर्यंत कमी झाला आहे. ही तफावत नक्की कशामुळे आली आहे?

MPSC च्या रखडलेल्या परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर करा : रविकांत तुपकर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) राज्यसेवा २०२४, संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा २०२४ व समाजकल्याण  विभाग २०२३ (State Services 2024, Joint Group B & C Pre Exam 2024 and Social Welfare Department 2023) च्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. राज्य सेवेतील अनेक पदांवर शून्य भरती करण्यात आलेली आहे, किंबहुना काही पदेच गेल्या १० वर्षांत नाहीशी झाली आहेत. येत्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आयोगाकडे केली आहे. 

वनपरिक्षेत्र अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या पदांचा आकडा अनुक्रमे २७२ वरुन ११ व ९९७ वरुन २६ पर्यंत कमी झाला आहे. ही तफावत नक्की कशामुळे आली आहे? करोडोंचा रोजगार निर्माण होणार या आशेवर बसलेल्या तरुणाईच्या तोंडाला सरकार पाने पुसत आहे. हे सर्व थांबले पाहिजे आणि तरुणांच्या रोजगारासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी पोस्ट रविकांत तुपकर यांनी एक्स या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही दिवसांपुर्वी एक परिपत्रक जाहीर करून, समाज कल्याण विभाग परीक्षा 2023 व राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे सांगितले. या गोष्टीला एक महिन्याचा कालावधी उलटला असून अद्याप कोणताही निर्णय समोर आला नसल्याने एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे उमेदवार चिंतेत आहेत. 

'एमपीएससी'ने परीक्षा पुढे ढकलताना परीपत्रकात 'यथावकाश' हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जाणार यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नैराश्य आले असून त्यांच्यासमोर आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे तयारी करणारे विद्यार्थी चिंतेत आहेत.