बार्टीकडून संशोधक विद्यार्थ्यांची घोर फसवणूक; परीक्षा रद्दचा निर्णय घेतला मागे

बार्टीने सुध्दा १० जानेवारी रोजी परीक्षा घेतली जाणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

बार्टीकडून संशोधक विद्यार्थ्यांची घोर फसवणूक; परीक्षा रद्दचा निर्णय घेतला मागे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बार्टीने (Barti)2022 च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी आणि या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी फेलोशिप चाळणी परीक्षा रद्द (Canceled Fellowship Screening Examination) करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर बार्टीने 2022 च्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध नुकतेच प्रसिध्द केले  होते. मात्र, बार्टी ,सारथी  ,महाज्योती (Barti, Sarathi, Mahajyoti) यांच्या सामान धोरणाच्या अनुषंगाने सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेतली नसल्याचे कारण देत परीक्षा रद्दचा निर्णय मागे घेत असल्याचे परिपत्रक बार्टीचे महासंचालक सुनील वारे (Barti Director General Sunil Vare) यांनी प्रसिध्द केले आहे. 

बार्टी ,सारखी ,महाज्योती या शासकीय संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. परंतु, राज्य शासनाने सरसकट फेलोशिप न देता चाळणी परीक्षा घेऊन फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २४ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या माध्यमातून फेलोशिप परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेत गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करून येत्या १० जानेवारी रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.परंतु, परीक्षा न घेता बार्टीने 2022 च्या सरसकट फेलोशीप द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन केले.त्यावर बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला होता.त्यानंतर  बार्टीने 2022 च्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. 

हेही वाचा : बार्टीच्या 2022 च्या विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षा रद्द ; सेट विभाग 10 जानेवारीला परीक्षा घेणार
चाळणी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय दोन दिवसातच फिरवल्याने बार्टीकडून संशोधक विद्यार्थ्याची फसवणूका झाली असल्याचा आरोप वंचित युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला असून राज्य शासनाला उच्च न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा दिला आहे.

 बार्टीने परीक्षा रद्दचे पत्रक प्रसिद्ध केले होते.मात्र, याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाला याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला नव्हता.त्यामुळे १० जानेवारी रोजी परीक्षा घेतली जाणार असल्याचे सेट विभागाने स्पष्ट केले होते.त्यात आता बार्टीने सुध्दा १० जानेवारी रोजी परीक्षा घेतली जाणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

-----------------------------------------------

 बार्टीने आम्हा विद्यार्थ्यांची  दिशाभूल केली आहे.तीन माहिने आम्ही आंदोलन केले.त्यानंतर परीक्षा रद्दचा निर्णय घेतला.मात्र, आता पुन्हा परीक्षा घेण्याचे जाहीर केले.त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांवर बार्टीने अन्याय केला आहे. - प्रवीण गायकवाड, विद्यार्थी