सिनेट सदस्य सचिन गोरडे पाटील यांना बडतर्फ करा ; विद्यापीठ शिक्षकेतर संघटनेची मागणी

प्रसार माध्यमांसमोर केलेले आरोप हे संतापजनक असून या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो.

सिनेट सदस्य सचिन गोरडे पाटील यांना बडतर्फ करा ; विद्यापीठ शिक्षकेतर संघटनेची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील यांनी कोणतीही माहिती न घेता विद्यापीठाशी निगडित असणाऱ्या विविध विषयांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत विद्यापीठाची प्रतिमा मलिन करण्याची कृती केले असून त्याचा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे. तसेच गोरडे पाटील यांना आधिसभा सदस्य या पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर सेवक कृती समितीतर्फे करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील प्रश्नपत्रिका डी टी पी चे काम, तंत्रज्ञान विभागातील विविध शैक्षणिक करार आणि विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सामूहिक विमा या विषयासंदर्भात सचिन गोरडे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावर विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन  गोरडे पाटील यांना बडतर्फ करावे, या मागणीचे निवेदन विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले.

अधिसभा सदस्य हे  विद्यापीठ अधिकार मंडळाचे सदस्य असतात.  त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता अधिसभेचे व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यांनी  विद्यापीठाच्या अधिकार मंडळाशी चर्चा करून किंवा संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडून माहिती घेऊन या विषयावर बोलणे अपेक्षित होते. मात्र कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता त्यांनी कोणतीही प्रशासकीय माहिती न घेता गंभीर आरोप केले आहेत, असे आम्हा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी वर्गाचे मत असल्याचे कृती समितीने निवेदनात नमूद केले आहे.

प्रसार माध्यमांसमोर केलेले आरोप हे संतापजनक असून या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो. तसेच या बाबीची गंभीर दाखल घेऊन सचिन गोरडे पाटील यांना आधिसभा सदस्य या पदावरून बडतर्फ करावे, या मागणीचे निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुनील धिवार,  भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंत्रे , इंटक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ यांनी दिले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी संतोष मदने, शिवाजी उत्तेकर, किशोर घडीयार यांच्यासह सदानंद बनसोडे, राजेंद्र घोडे, रवींद्र मेढे ,डी.पी. गरुड, आर.एस. पंडित, एम.डी. निकाळजे आदी उपस्थित होते.