बापरे : गणितात 200 पैकी 212 तर गुजरातीत 200 पैकी 211 गुण; निकाल झाला व्हायरल 

हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बापरे : गणितात 200 पैकी 212 तर गुजरातीत 200 पैकी 211 गुण; निकाल झाला व्हायरल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 देशाभरातील अनेक बोर्डाच्या शाळांचे निकाल मे महिन्यात जाहीर केले जातात. गुजरात येथील अशाच एका शाळेचा गजब निकाल (school result) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral on social media) होत आहे. या निकालात गणित विषयाला 200 पैकी 212 आणि गुजराती या विषयामध्ये 200 पैकी 211 (212 out of 200 in Mathematics and 211 out of 200 in Gujarati) असे गुण विद्यार्थ्यीनीला देण्यात आले आहेत.  शाळेने जाहीर केलेल्या या निकालामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. 

मुलीचा निकाल पाहिल्यानंतर पालकांनी ही चूक शाळेच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर शाळेकडून तात्काळ मार्कशीटमध्ये सुधारणा करुन नवीन गुणपत्रक देण्यात आले. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु ,नेटकऱ्यांनी मार्कशीटचे चांगले मीम्स तयार केले आहेत. 

गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील कृष्णा या गावातील हे गुणपत्रक आहे. चौथीच्या वर्गात शिकवणाऱ्या वंशीबेन मनीषभाई हिचा हा निकाल आहे. तिचा हा निकाल पाहून कुटुंबातील सदस्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. कारण वंशीबेन हिला गुजराती या विषयामध्ये 200 पैकी 211 तर गणित या विषयामध्ये 200 पैकी 212 गुण मिळाले होते. शाळेच्या लक्षात हा प्रकार आणून दिल्यानंतर नवीन मार्कशीट तिला देण्यात आले. मात्र, तोपर्यंत हा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

नवीन गुणपत्रकात वंशीबेन हिला गुजरातीमध्ये 200 पैकी 191 आणि गणितामध्ये 190 गुण मिळाले. बाकी विषयामध्ये काहीच बदल झाले नाही. एकूण 1000 पैकी 934 गुण देण्यात आले आहेत. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून ही चूक कोणाकडून झाली, त्याची चौकशी आता करण्यात येणार आहे.