RTE NEWS: आरटीई प्रवेश प्रक्रिया बंद ; पुन्हा केव्हा सुरू होणार..

शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशास अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली असल्याचे पोर्टलवर नमूद करण्यात आले आहे.

RTE NEWS: आरटीई प्रवेश प्रक्रिया बंद ; पुन्हा केव्हा सुरू होणार..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

RTE Admission News: मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court)राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील (Right to Education Act)बदलाला स्थगिती दिली.त्यानंतर आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी राबवली जात असलेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (rte admission process) थांबवली आहे.आरटीई प्रवेशाच्या पोर्टलावर(RTE Admission Portal)याबाबतची सूचनाही प्रसिध्द केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद (Online link temporarily closed)केली असल्याचे पोर्टलवर नमूद करण्यात आले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दर वर्षी राबवण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल करण्यात आला.त्यानुसार विद्यार्थ्यांना शासकीय शाळा, अनुदानित शाळा , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसहाय्यीत शाळेत प्रवेश देण्याचे धोरण जाहीर करण्यात आला. मात्र,त्यावर पालक संघटना व सर्व सामान्य पालकांनी मोठा रोष व्यक्त केला. तसेच याबाबत न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या.त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या आरटीई कायद्यातील बदलला स्थगिती दिली. परिणामी आता शिक्षण विभागाला नव्याने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे.त्यामुळेच सध्या अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. 

शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी राज्यातील सर्व पात्र शाळांची नोंदणी करून घण्यात आली.राज्यातील  76 हजार 53 शाळांमधील आरटीईच्या  8 लाख 86 हजार 411 जागांसाठी आत्तापर्यंत 69 हजार 361 पालकांनी अर्ज केले आहेत. दरवर्षी सुमारे एक लाख जागांसाठी तीन ते  साडे तीन लाख अर्ज येत होते. मात्र, या वर्षी केवळ शासकीय शाळा प्रवेशासाठी उपलब्ध करून दिल्याने पालकांनी आरटीई प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. शासनाने स्वीकारलेल्या चूकीच्या धोरणाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसणार असल्याने न्यायालयात दाद  मागण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या 9 फेब्रुवारी 2024 च्या अधिसूचनेला स्थगिती दिली. परिणामी पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा,यासाठी प्रयत्न करण्याचा पर्याय खुला झाला आहे. मात्र आरटीई प्रवेशासंदर्भात शासनाकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या प्रक्रियेबाबत जाहीर केल्या जाणाऱ्या निर्णयानंतर त्यात अधिक स्पष्टता येणार आहे.