कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच डॉ. पराग काळकर यांची प्र-कुलगुरू पदी नियुक्ती

गुन्हा दाखल असणाऱ्या व्यक्तीची पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी केलेली नियुक्ती रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली .परंतु,विद्यापीठ कायद्यातील तरतुदीचा व शासनाच्या सर्व नियमांचा अभ्यास करूनच ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच डॉ. पराग काळकर यांची प्र-कुलगुरू पदी नियुक्ती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) प्र-कुलगुरू (Pro vice chancellor) पदी नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. पराग काळकर (parag kalkar) यांच्या नियुक्तीवर राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. मात्र,सर्व कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच डॉ.काळकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : शिक्षण SPPU News : डॉ. पराग काळकर यांनी स्वीकारला प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये प्र-कुलगुरू पदी डॉ.पराग काळकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आक्षेप घेतला.तसेच गुन्हा दाखल असणाऱ्या व्यक्तीची पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी केलेली नियुक्ती रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली.परंतु,विद्यापीठ कायद्यातील तरतुदीचा व शासनाच्या सर्व नियमांचा अभ्यास करूनच ही नियुक्ती करण्यात आली आहे,असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

डॉ.काळकर यांची नियुत्ती करताना काही गोष्टींचा विचार करण्यात आला होता.त्यात प्र- कुलगुरू पदी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम केलेली व्यक्ती व संलग्न महाविद्यालयातील कामाचा प्रदिर्घ अनुभव असणारी व्यक्ती असावी.तसेच कुलगुरू व प्र-कुलगुरू या दोन्ही व्यक्ती एकाच विद्याशाखेच्या असण्याऐवजी दोन वेगवेगळ्या विद्याशाखेच्या असतील तर विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरेल.येणा-या काळात विद्यापीठाचे रँकिंग वाढवणे, नॅक मूल्यांकनात विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्र-कुलगुरू यांची लवकर निवड करणे गरजेचे होते. 
      विद्यापीठात यापूर्वी नियुक्त झालेल्या प्र -कुलगुंरूमध्ये बहुतांश जण हे संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्यच होते. विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्यासाठी संलग्न महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्र - कुलगुरू असल्यास विद्यापीठाला जलद गतीने पुढे घेऊन जाणे सोईचे होईल. हा विचार करून डॉ.काळकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या नियुक्तीचे अभिनंदन केले आहे, असे विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे. 
 विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, माझ्याकडे प्राप्त झालेल्या सर्व अर्जांमधून योग्य उमेदवार प्र- कुलगुरू पदासाठी निवडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.विद्यापीठ कायद्यातील सर्व तरतुदी व शासनाचे नियम तपासूनच काळकर यांच्या प्र- कलगुरू निवडीचा निर्णय घेण्यात आला.त्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने संमती दिली आहे.