SPPU News : डॉ. पराग काळकर यांनी स्वीकारला प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्यानंतर आता प्र-कुलगुरू म्हणून कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती.

SPPU News : डॉ. पराग काळकर यांनी स्वीकारला प्र-कुलगुरू पदाचा कार्यभार
Dr. Parag kalkar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University ) प्र-कुलगुरू (Pro-Vice Chancellor) पदाचा कार्यभार डॉ. पराग काळकर  (Dr. Parag Kalakar) यांनी सोमवारी स्वीकारला. त्यामुळे विद्यापीठाला तब्बल अडीच महिन्यांनी नवे प्र-कुलगुरू मिळाले आहेत. नियुक्तीला विलंब झाल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्यानंतर आता प्र-कुलगुरू म्हणून कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. कुलगुरूंच्या निवडीनंतर 80 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही त्यावर निर्णय झाला नव्हता. शनिवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरूंनी काळकर यांची नियुक्ती केली. काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत.

...हे अतिशय गंभीर! पराग काळकर यांच्या नियुक्तीवर विजय वडेट्टीवार यांचा आक्षेप

सोमवारी डॉ. पराग काळकर यांनी विद्यापीठ आवारातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज पदभार स्वीकारला. विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव,अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, सर्व संविधानिक अधिकारी तसेच प्रशासकिय व शैक्षणिक विभागप्रमुख यांनी त्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

दरम्यान, डॉ. काळकर यांच्या नियुक्तीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी रविवारी ट्विट करत म्हटले की, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र - कुलगुरू पदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे? ही नियुक्ती राजकीय दबावातूनच झाली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऐतिहसिक पार्श्वभूमी आहे. चरित्र जोपासना हे विद्यापीठाचे काम आहे.

प्र. कुलगुरुंची (प्रो व्हीसी) निवड हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असुन जो विद्यापीठाच्या भविष्यकालीन वाटचालीवर आणि विद्यापीठाच्या प्रशासन तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकतो. प्र - कुलगुरू पदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नियुक्तीने केवळ तात्काळ शैक्षणिक परिदृश्यावर परिणाम होणार नाही तर विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीवरही त्याचा परिणाम होणार आहे. पण विद्यापीठात जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. यातून नेमके काय साध्य करायचे आहे?, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo