नायब तहसीलदारपदी निवड झालेले अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांचा खेळाडूचा दावा खोटा; MPSC कडून शिफारस रद्द

आयोगाकडून कोणत्याही पदांसाठी उमेदवारांची निवड करताना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होते.

नायब तहसीलदारपदी निवड झालेले अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांचा खेळाडूचा दावा खोटा; MPSC कडून शिफारस रद्द
MPSC Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यसेवा परीक्षा २०१९ (State Service Examination 2019) मधून खेळाडू कोट्यातून निवड झालेले अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांचा दावा खोटा असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नायब तहसीलदार (Tahasildar) पदासाठी करण्यात आलेल्या शिफारस रद्द केल्याची माहिती आयोगाने अधिकृत ट्विटरवरून दिली आहे.

आयोगाकडून कोणत्याही पदांसाठी उमेदवारांची निवड करताना त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होते. एखाद्या उमेदवाराकडून विविध आरक्षणाबाबत दावा केल्यानंतर ते आरक्षण सिध्द करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. अन्यथा त्यांची निवड कोणत्याही पातळीवर रद्द होऊ शकते. तसेच फसवणूक केली असल्यास त्यांना पुन्हा परीक्षा देण्यापासून प्रतिबंधित केले जाते.

त्यानुसार सोमवारी आयोगाने नायब तहसीलदार पदासाठी निवड झालेल्या दोन उमेदवारांना कायमस्वरुपी प्रतिबंधित केल्याचे जाहीर केले आहे. आयोगाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यसेवा परीक्षा २०१९ मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करून आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo