अभ्यास मंडळावरील सर्व नियुक्त्या नवे कुलगुरू करणार? अधिसभा सदस्यांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अधिसभा सदस्य डॉ. हर्ष जगझाप, डॉ. करिश्मा परदेशी व डॉ. हर्ष गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. कारभारी काळे पत्र लिहून आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

अभ्यास मंडळावरील सर्व नियुक्त्या नवे कुलगुरू करणार? अधिसभा सदस्यांचा सात दिवसांचा अल्टिमेटम
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) विविध अभ्यास मंडळावर कुलगुरूंद्वारे (Vice Chancellor) केल्या जाणाऱ्या नियुक्ती प्रक्रियेत अक्षम्य चुका व गोंधळ झाला आहे. नामनिर्देशने करण्याच्या कामात ज्यांना कायदेशीर अधिकार नाहीत, अश्या व्यक्तींना प्रक्रियेत सामावून घेतले गेले आणि त्या व्यक्तिंनी आपल्या विचारसरणीच्या अथवा आपल्याशी जवळीक असलेल्या व्यक्तींबाबत पक्षपाती राहून या नेमणुका केल्याचा गंभीर आरोप काही अधिसभा सदस्यांनी (Senate Members) केला आहे. तसेच सर्व नामनिर्देशने रद्द करून नव्या कुलगुरूंच्या अधिकारात ही सर्व प्रक्रिया नव्याने पार पाडावी, अशी मागणी केली आहे. (Savitribai Phule Pune University)

अधिसभा सदस्य डॉ. हर्ष जगझाप, डॉ. करिश्मा परदेशी व डॉ. हर्ष गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. कारभारी काळे पत्र लिहून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. अभ्यास मंडळावर नियुक्त्या करताना विद्यापीठाने योग्य ते निकष लावले नाहीत व पारदर्शकता पाळली नाही. त्यामुळे अपात्र उमेदवारांचे नामनिर्देशन मोठ्या संख्येने झाले होते. विद्यापीठाने अनेक नामनिर्देशन रद्दही केली आहेत. शिवाय अभ्यास मंडळांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस स्थगितीही दिली आहे. तसेच या रद्द केलेल्या नामनिर्देशनाशिवायही अनेक चुकीची नामनिर्देशने अद्यापही कायम आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेत झालेल्या या गोंधळामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला मोठा धक्का लागुन नामुष्की झाली आहे, असे पत्रात म्हटले आहे.

नायब तहसीलदारपदी निवड झालेले अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांचा खेळाडूचा दावा खोटा; MPSC कडून शिफारस रद्द

विद्यापीठाची खालावलेली प्रतिष्ठा सावरणे हे आजघडीला अत्यंत आवश्यक बनले आहे. यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थेत तातडीने सुधारणा व्हायला हवी. त्यासाठी या गोंधळास जबाबदार असलेल्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व नव्याने होणाऱ्या नामनिर्देशन प्रक्रियेतील त्यांचा सहभाग थांबवावा. त्यांचेवर चौकशी समिती नेमून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांचेवर पदाचा गैरवापर लेल्या प्रकरणी शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशी मागणी सदस्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार, पण जुन्या पुस्तकांचे काय? बालभारतीच्या संचालकांनी दिली माहिती

अभ्यास मंडळांवरील आजवर झालेली सर्व नामनिर्देशने रद्द करावीत आणि येणाऱ्या नव्या कुलगुरूंच्या अधिकारात ही सर्व प्रक्रिया नव्याने पार पाडावी, अभ्यास मंडळांवरील नामनिर्देशने करण्याची प्रक्रिया व अभ्यास मंडळांच्या अध्यक्ष पदाची निवडणुक पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीने व्हावी यासाठी आदर्श आचार संहिता तयार करून लागू करावी, अभ्यास मंडळांत अनुभवी आणि तरुण प्राध्यापकांचा समतोल असावा अश्या प्रकारे नामनिर्देशन करावे, नामनिर्देशनासाठी इतर पात्र व्यक्ती उपलब्ध असल्यास अभ्यास मंडळांत एका व्यक्तीचे सलग दोन कालावधीसाठी नामनिर्देशन करू नये, याकडेही अधिसभा सदस्यांनी लक्ष वेधले आहे.

विद्यापीठाची प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या मागण्याची गंभीर दखल घेऊन त्याबाबतचा निर्णय येत्या सात दिवसांत जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणे भाग पडेल, असा इशारा सदस्यांनी दिला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo