UGC अध्यक्षांनी सांगितली CUET UG निकालाची वेळ ; नवीन ट्वीट केले प्रसिध्द 

CUET UG परीक्षा २०२३  चा निकाल आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळ पर्यंत जाहीर होणार आहे.

UGC अध्यक्षांनी सांगितली CUET UG निकालाची वेळ ; नवीन ट्वीट केले प्रसिध्द 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट  (CUET UG परीक्षा २०२३) च्या निकालाची सर्व उमेदवार वाट पाहत आहेत.  त्याचवेळी  युजीसीकडून निकाल जाहीर करण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या तारखा समोर येत आहेत. आता विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी CUET UG परीक्षा २०२३ च्या निकालासंदर्भात नवीन ट्वीट केले आहे. त्यानुसार CUET UG परीक्षा २०२३ चा निकाल आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होणार आहे. 

   जगदीश कुमार यांनी यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) UG चा  निकाल १५ जुलै पर्यंत जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर काल  एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत निकाल १७ जुलै पर्यंत लागेल, असे जगदीश कुमार यांनी सांगितले होते.  पण आज पुन्हा जगदीश कुमार यांच्याकडुन त्यांच्या  ट्विटर हॅण्डलवरून नवीन माहिती समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले  आहे.  

हेही वाचा : शिक्षण महाराष्ट्रात ५० हजार शिक्षकांची भरती : शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

"नॅशनल टेस्टिंग एजन्सी लवकरात लवकर निकाल जाहीर करण्यासाठी वेगाने काम करत आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी म्हणजेच १६ जुलै २०२३ पर्यंत निकाल जाहीर करण्याचे NTA चे उद्दिष्ट आहे," असे जगदीश कुमार यांनी त्यांच्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

केंद्रीय, राज्य, डीम्ड आणि इतर सहभागी खाजगी विद्यापीठे आणि स्वायत्त संस्थांच्या पदवीपूर्व कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा गेल्या वर्षी म्हणजे २०२२ पासून सुरु करण्यात आल्या होत्या. यावर्षी CUET UG परीक्षेला  सुमारे १४ लाख, ९० हजार  उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर १३ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. 
उमेदवारांना २९ जून ते १ जुलै या कालावधीत आन्सर  की ला  आव्हान करण्याची परवानगी देण्यात आली होती. सुमारे २५ हजार ७८२ आव्हाने प्राप्त झाली होती. NTA ने काही दिवसांसाठी दररोज रात्री सुधारित तात्पुरती उत्तरे प्रसिध्द केली होती.