MPSC Exam : टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा होणार; आयोगाचा मोठा निर्णय
आयोगाकडून मुंबई येथील केंद्रावर टंकलेखन कौशल्य चाचणी दि. ७ एप्रिल रोजी घेतली होती. अनेक उमेदवारांनी चाचणीदरम्यान तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी आयोगाकडे केल्या होत्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२१ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गासाठी दि. ७ एप्रिल रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी (Typing Skill Test) घेतली होती. पण या याचणीदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले. परिणामी, ही चाचणी पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. आयोगानेही विद्यार्थ्यांची (Students) ही मागणी मान्य करत मोठा दिलासा दिला आहे.
आयोगाकडून मुंबई येथील केंद्रावर टंकलेखन कौशल्य चाचणी दि. ७ एप्रिल रोजी घेतली होती. अनेक उमेदवारांनी चाचणीदरम्यान तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी आयोगाकडे केल्या होत्या. याअनुषंगाने सोमवारी आयोगाकडून ही चाचणी पुन्हा घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ७ एप्रिल रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने आयोजित करण्यात येईल.
प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी ही आयोगाच्या समक्रमांकाच्या दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद मानकांनुसार घेण्यात येईल. चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांना सूचना नव्याने प्रसिद्ध केल्या जातील. या सूचना उमेदवारांवर बंधनकारक असतील. प्रस्तावित चाचणीस अनुपस्थित उमेदवारांचा अथवा चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांचा निवडप्रक्रियेकरीता विचार करण्यात येणार नाही.
प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी फक्त मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. चाचणीचा दिनांक व वेळ स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल, असे आय़ोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.