'टीसीएस’ च्या आणखी दोन कर्मचाऱ्यांवर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दोन कर्मचाऱ्यांनी लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्तसमोर आले आहे.

'टीसीएस’ च्या आणखी दोन कर्मचाऱ्यांवर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तलाठी भरतीत (talathi bharti ) टीसीएस कंपनीतील एका कर्मचाऱ्याने आपल्या नेतेवाईकांना पास करून घेतल्याची तक्रार स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने राज्य शासनाकडे केली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या परीक्षेत ‘टीसीएस’ कंपनीच्या (employees of TCS)दोन कर्मचाऱ्यांनी लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याचे वृत्तसमोर आले आहे. त्यामुळे टीसीईएसच्या कार्यपध्दतीवर व नोकर भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. 

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या झालेल्या परीक्षेत ‘टीसीएस’ कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी कॉपी पुरवल्याप्रकरणी धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून बाहेर आली आहे. लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत झालेला गोंधळ समोर आला होता. लातूर पोलिसांनी याचा तपास करून प्राथमिक तपासणी अहवाल सादर केला आहे.त्यानुसार  टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण प्रकाश झोतात आले आहे.

तलाठी भरतीमध्येही लातूर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहूल कावठेकार यांनी केला होता.तसेच राज्य शासनाला याबाबत निवेदन देण्यात आले होते.या प्रकारांमुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान, टीसीएस कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.