मुंबई विद्यापीठ 'आविष्कार'चा विजेता; SPPU ठरले उपविजेता 

पेटंटच्या बाबतीत आपल्या देशाचा वाटा जागतिक स्तरावर अल्प प्रमाणात आहे.

 मुंबई विद्यापीठ 'आविष्कार'चा विजेता; SPPU ठरले उपविजेता 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय 'अविष्कार 2024 ' (AVISHKAR-2024) या संशोधन प्रकल्प स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) बाजी मारली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपविजेता (Savitribai Phule Pune University runner up) ठरले आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (AICTE) उपाध्यक्ष डॉ.अभय जिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. " संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आविष्कार हे एक व्यासपीठ आहे. या स्पर्धेतील अव्वल क्रमांक महत्वपूर्ण नसून आपले संशोधनातील सातत्य गरजेचे आहे."असे मत जेरे यांनी यावेळी व्यक्त केले. 

आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार-2024’ आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय संशोधन महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यकमास एआयसीटीईचे उपाध्यक्ष तसेच चिफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ. अभय जेरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी प्र-कुलगुरु  डॉ. मिलिंद निकुंभ, कुलचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, मा. राज्यपाल कार्यालयाकडून गठित सल्लागार व परीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, डॉ. भगवान जोगी, वित्तीय व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. भिमराव पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर,विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.मनोजकुमार मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : पीएचडी गाईडबाबत प्राध्यापकांवरील अन्यायाविरोधात एमफुक्टो न्याय मागणार

डॉ. अभय जेरे म्हणाले, पेटंटच्या बाबतीत आपल्या देशाचा वाटा जागतिक स्तरावर अल्प प्रमाणात आहे. चिनकडून सोळा लाखापेक्षा अधिक पेटंट दरवर्षी येतात तर भारतातर्फे केवळ 70,000 दाखल झाले आहेत. यातही बहुसंख्य परदेशातील भारतीयांचे आहेत. भारतात साडेतीन कोटींच्या आसपास उच्च शिक्षण घेणारे तरुण आहेत, असे असतांना जागतिक स्तरावर संशोधनाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपले रिसर्च वर्क व्हायला हवे. 

कुलगरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) म्हणाल्या, संसाधनाचा कमी वापर, पुर्नवापर व पुर्ननिर्मिती या तीन गोष्टींवर संशोधन करुन त्यांचा समाजासाठी उपयोग होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी सर्जनशील विचार करणे गरजेचे आहे.नवकल्पनांना नेहमी चालला द्यावी त्यांचा अंगिकार करावा. संशोधन आणि शिक्षण यांचा समन्वय गरजेचा असून याचा गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.समाजोपयोगी व जागतिकस्तरावर नावलौकिक होईल,असे संशोधन कार्य विद्यार्थ्यांनी करावे.

डॉ. सुनिल पाटील म्हणाले,‘आविष्कार-2024’ मधील निवडक स्पर्धकांना मा. राज्यपाल यांच्या कार्यालयामार्फत आयोजित ’एन्क्युबेशन’ प्रकल्पांतर्गत नामांकित कंपनीच्या उद्योजकांच्या समोर संशोधन प्रकल्प सादर करण्याची संधी देण्यात येईल.
---------------

आविष्कार स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपविजेते ठरले आहे. विद्यापीठाच्या संघातील एका विद्यार्थ्याला सुवर्ण पदक मिळाले आहे. विद्यापीठाच्या संघाने फार मेहनतीने स्पर्धेत सहभाग घेतला.या पुढील स्पर्धेत अधिक तयारीने विद्यापीठ या स्पर्धेला सामोरे जाईल.

- डॉ. संजय ढोले , संचालक , आय.क्यू.ए.सी. विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ