कौतुकास्पद : एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर पीएच.डी.

पुण्यातील अर्चना अडसुळे यांनी हे संशोधन केले असून त्यांना विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. ‘कर्डेलवाडी जिल्हा परिषद एक विशेष शाळा : अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

कौतुकास्पद : एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर पीएच.डी.

राजानंद मोरे

 

शाळेला सुट्टी (School Holiday) असेल तर विद्यार्थ्यांना सर्वाधिक आनंद होत असतो. त्यामुळे साप्ताहिक सुट्टीची किंवा सण-उत्सवाला असलेल्या सुट्ट्यांची ते आतुरतेने वाट पाहत असतात. पण शाळेला एकही दिवस सुट्टी नसेल तर... महाराष्ट्रात (Maharashtra) अशी एक शाळा आहे, ती ३६५ दिवस सुरू असते. ही शाळा म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी या गावातील जिल्हा परिषदेची शाळा (ZP School Kardelwadi). ही किमया करणाऱ्या शाळेचे सर्वदूर कौतूक होत असताना आता त्यावर संशोधनही (Research) झाले असून या संशोधनाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) पीएचडी (Ph.D.) प्रदान केली आहे.

 

पुण्यातील अर्चना अडसुळे (Archana Adsule) यांनी हे संशोधन केले असून त्यांना विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. ‘कर्डेलवाडी जिल्हा परिषद एक विशेष शाळा : अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. अतुल कुलकर्णी हे मार्गदर्शक होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळा ३६५ दिवसांपैकी २२० दिवस सुरू असली पाहिजे. पण कर्डेलवाडी येतील जिल्हा परिषदेची शाळा एकही दिवस सुट्टी न घेता ३६५ दिवस अविरतपणे विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहे. हे काम कसे चालते, मुलांना शिकवत गावाचे प्रबोधन कसे होते, सर्वसाधारण गुणवत्तेची शाळा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचवणे कसे शक्य झाले, त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, गावकरी कोणते आणि कसे प्रयत्न करतात, याची माहिती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हे संशोधन करण्यात आले आहे.

SPPU News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दिवाळीची सुट्टी जाहीर, सलग दहा दिवस विद्यापीठ बंद

 

जिल्हा परिषदेची ही शाळा इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असून दोनच शिक्षक आहेत. मुख्याध्यापक द. रा. सकट असून त्यांच्या पत्नी बेबीनंदा या शिक्षिका आहेत. २००१ पासून ही शाळा अव्याहतपणे ३६५ दिवस सुरू आहे. शाळेच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असली तरी त्यावर अद्याप पीएचडी म्हणजे संशोधन झालेले नव्हते. या बारमाही शाळेतील अध्ययन-अध्यापन पध्दती, शालेय आंतरक्रिया, शाळेत राबविल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण व नाविण्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास, परिणामांची माहिती यातून अर्चना अडसुळे यांनी शाळेचा लेखाजोखा मांडत संशोधन पूर्ण केले आहे.

 

अडसुळे यांनी त्यासाठी १९८० ते २००० आणि २००१ ते २०२० या कालावधीतील उपक्रमांची माहिती घेत तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी विविध निष्कर्ष काढले असून शिफारशीही केल्या आहेत. त्यानुसार, शाळा ३६५ दिवस सुरू करण्यापुर्वी शाळेत प्राथमिक सुविधाही नव्हत्या. सर्व सुट्ट्या घेतल्या जात होत्या.  शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थी-पालकांचा पुरेसा सहभाग नव्हता. मात्र, बारमाही शाळेचा उपक्रम सुरू झाला अन् हे चित्र बदलू लागले.

 

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रबोधन करून त्यांना शिक्षणाविषयी भीती वाटू नये, असे वातावरण तयार करण्यात आले. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, शिक्षणाचा दर्जा टिकून राहावा, पालकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यातून मग विद्यार्थ्यांमध्येही शाळेविषयीचा ओढा वाढत गेला. गावकऱ्यांचेही मदतीचे हात पुढे आले, कार्यात सहभाग वाढला. भौतिक सुविधा वाढल्या. त्यामुळे आता महाराष्ट्रभरातून पालक कर्डेलवाडी शाळेत आपल्या पाल्यास शिक्षण घेता यावे यासाठी गावात वास्तव्यास येतात. अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शाळेची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचल्याचे निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आले आहेत.

 

संशोधनातून करण्यात आलेल्या काही महत्वाच्या शिफारशी

१. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त किंवा सलग सुट्ट्यांमधील काही काळा वापरून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गटपध्दतीने अध्ययन करण्याची संधी दिल्यास अध्ययन सुलभ होण्यास व अध्ययनाची आवड निर्माण होण्यास मदत होईल.

२. अध्ययनात प्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अवांतर संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी.

३. शासनाने नेमून दिलेल्या क्षमतांपेक्षा जास्त क्षमतांचे विकसन विद्यार्थ्यांमध्ये करण्याचा प्रयत्न शाळांनी करावा.

४. शाळेचा गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी समाजातील व्यक्ती, ग्रामस्थ, पालक यांचा सहभाग व सहकार्य सतत घेत राहावे.

५. इतर शाळेतील शिक्षकांनी कर्डेलवाडी येथील शाळेला भेट देवून शाळेत राबविल्या जाणाऱ्या

नाविण्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करून त्यांनी आपल्या शाळेत असे उपक्रम राबवावेत.

६. कर्डेलवाडी शाळेत राबविल्या जाणाऱ्या वैशिष्टपूर्ण उपक्रमांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO