SPPU News : विद्यार्थी संघटनांचा वाद पोलीस आयुक्तांच्या दरबारी; नियमावली तयार करणार?

विद्यापीठात काही दिवसांपुर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट् फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. एका कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

SPPU News : विद्यार्थी संघटनांचा वाद पोलीस आयुक्तांच्या दरबारी; नियमावली तयार करणार?
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) मागील काही दिवसांत उफाळून आलेला विद्यार्थी संघटनांमधील (Students Union) वाद आता पोलीस आयुक्तांच्या (Pune Police) दरबारी पोहचणार आहे. संघटनांमध्ये झालेल्या जोरदार राड्यानंतर विद्यापीठ प्रशासनासह पोलिसांनी याची गंभीरपणे दखल घेतली आहे. यापार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी संघटना व विद्यापीठ प्रशासनाची पोलीस आयुक्तांकडून शनिवारी (दि. १९) विद्यापीठात बैठक घेतली जाणार असून त्यामध्ये संघटनांनासाठी नियमावली (SOP) तयार केली जाणार असल्याचे समजते.

 

विद्यापीठात काही दिवसांपुर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्टुडंट् फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. एका कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनी दोन्ही संघटनांकडून पोलिसांकडून तक्रारी दाखल केल्यानंतर गुन्ही दाखल झाला आहे. ही घटना ताजी असताना विद्यापीठाच्या वसितगृहातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त लेखन करण्यात आले होते.

कौतुकास्पद : एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर पीएच.डी.

 

पंतप्रधान मोदींविषयीच्या आक्षेपार्ह लेखनाचा निषेध करण्यासाठी दुसऱ्या दिवशी भाजपने विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान एका संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला होता. या घटनांनंतर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी कडक निर्बंध लागू केले. तर पोलिसांकडूनही जमाव बंदी करण्यात आली.

 

त्यानंतर आता विद्यार्थी संघटनांसाठीही नियमावली तयार केली जाणार असल्याचे समजते. विद्यार्थी संघटनांकडून येणारी निवेदने, बैठका, त्यावर प्रशासनाकडून मिळणारा प्रतिसाद, कुलगुरूंसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटी, आंदोलने तसेच इतर कार्यक्रमांसाठी एसओपी तयार केली जाणार असल्याचे समजते. त्यासाठी येत्या शनिवारी पोलीस आयुक्तांकडे विद्यार्थी संघटनांची बैठक बोलावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी संघटनांवर नेमकी कोणती बंधने येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठ आवारात शैक्षणिक पावित्र्य राखणे व वैचारिक स्वातंत्र्यासोबत सलोख्याचे वातावरण जपणे ही समाजाच्या सर्व घटकांची सामुदायिक जबाबदारी आहे, या अनुषंगाने विद्यापीठाशी संबंधित सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या संघटनांसोबत चर्चा करून सर्वंकष उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी म्हटले आहे. त्यासाठी शनिवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता विद्यापीठ मुख्य इमारतीतील ज्ञानेश्वर सभागृहात विद्यार्थी प्रतिनिधींची कुलगुरू व पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजत करण्यात आली आहे. संघटनेच्या कमाल ३ ते ५ प्रतिनिधींना बैठकीस उपस्थित राहता येणार असल्याची माहिती डॉ. काळकर यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO