राज्यातील शाळांमधील ३८ लाख स्वच्छता मॉनिटर्स करणार स्वच्छतेचा जागर

सुमारे ६४ हजारांहून अधिक शाळांची आणि ३८ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकडून साफसफाई करून घेणे अपेक्षित नाही.

राज्यातील शाळांमधील ३८ लाख स्वच्छता मॉनिटर्स करणार स्वच्छतेचा जागर
Swachhata Monitor

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालेय शिक्षण विभागांतर्गत (School Education Department) ‘लेट्स चेंज’ (Lets Change) या उपक्रमांतर्गत राज्यातील ६४ हजार शाळांमधील तब्बल ३८ लाख विद्यार्थी स्वच्छतेचा जागर करणार आहेत. या विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स (Swachhata Monitor) म्हणून ओळखपत्र दिले जाणार असून ते नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती करतील. अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना थांबवून त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar), उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, सहसचिव इम्तियाज काझी, लेट्स चेंज उपक्रमाचे संचालक रोहित आर्या यांच्यासह स्वच्छता मॉनिटर विद्यार्थी उपस्थित होते.

एकाच दिवशी १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनिसांना नियुक्तीपत्र, पाच वर्षांनंतर भरती

स्वच्छता मॉनिटर्स या उपक्रमाविषयी

लेट्स चेंज उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनणार असून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची नकळत होणारी चूक दाखवून देणार आहेत. सुमारे ६४ हजारांहून अधिक शाळांची आणि ३८ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकडून साफसफाई करून घेणे अपेक्षित नाही. तर, विद्यार्थी ‘स्वच्छता मॉनिटर’ होण्याची जबाबदारी घेतील. कुठेही निष्काळजीपणे कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसले, तिथे त्या व्यक्तीला थांबवून चूक दाखवून ती सुधारायला सांगतील.  

स्वच्छता मॉनिटर्स हे या घटनांचे छोटे मजेशीर विवरण देतानाचे व्ह‍िडिओ सोशल मीडियावर शेअर करतील. या अभियानात निवडलेल्या विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर’ ओळखपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच येत्या २ ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या दिवशी सर्वोत्तम पाच जिल्हे, शंभर शाळा आणि ३०० विद्यार्थ्यांना मुंबई येथे पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवा; देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुचना

मोठ्यांना मुलांचे ऐकावेच लागेल

उपक्रमाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, निश्चय केला की बदल घडतोच. त्यातही लहान मुले सांगतात ते मोठ्यांना ऐकावेच लागते. स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असून लेट्स चेंज या उपक्रमात ६४ हजार शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी सहभागी होत असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी समाजाला बदलण्याची किमया करू शकतात. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे महाराष्ट्र स्वच्छतेतही देशात पहिल्या क्रमांकावर राहील, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. राघवी पालांडे, श्रेया पवार, प्रदिप्ता घोष आदी स्वच्छता मॉनिटर्स विद्यार्थ्यांनी मनोगताद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo