जिल्हा परिषद भरती : आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता! गिरीष महाजनांनी केले सतर्क

राज्यात विविध सरळसेवा भरती परीक्षांमधील पेपरफुटीचा मुद्दा सध्या गाजत आहे. पावसाळी अधिवेशनातही अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

जिल्हा परिषद भरती : आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता! गिरीष महाजनांनी केले सतर्क

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Maharashtra Recruitment : राज्यात सध्या सुरू असलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti) प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. काही जणांना अटकही करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची भरती (ZP Recruitment) प्रक्रियाही सध्य सुरू असल्याने ग्रामविकास विभागही आता सतर्क झाला आहे. काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.

राज्यात विविध सरळसेवा भरती परीक्षांमधील पेपरफुटीचा मुद्दा सध्या गाजत आहे. पावसाळी अधिवेशनातही अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थी संघटनांकडून पेपरफुटीबाबत कठोर कायदा करण्याची मागणी होत आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होत असल्याच्या घटना समोर येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे. तलाठी भरतीपाठोपाठ राज्यातील ३५ जिल्हा परिषदांमधील तब्बल २० हजार जागांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेदरम्यानही गैरप्रकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पेपरफुटी, भरमसाठ शुल्क, रखडलेले निकाल अन् विद्यार्थ्यांचा आक्रोश; रोहित पवारांचा सरकारला अल्टीमेटम

यापार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी संयुक्त निवेदन प्रसिध्द करत उमेदवारांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील ३४ जिल्हा परिषदा अंतर्गत गट - क मधील ३० संवर्गातील एकूण १९ हजार ४६० इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत ची जाहिरात दि. ०५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. जाहिराती साठी दि. ०५ ऑगस्ट, २०२३ ते २५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

परिक्षेची संपूर्ण प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा अत्यंत पार दर्शक व काटेकोर पध्दतीने होणार आहे. तथापि, काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा फसवणूकी पासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभणास बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तर शासन जबाबदार नाही

फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्या विरूध्द जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असेही महाजन यांनी निवेदनात म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo