पुणे विद्यापीठाचा परीक्षा अर्ज भरण्याची शेवटची संधी

येत्या २५ मे रोजी केवळ एक दिवस विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे विद्यापीठाचा परीक्षा अर्ज भरण्याची शेवटची संधी
Pune university main building

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

    
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) (SPPU or UNIPUNE) विविध परीक्षांचे अर्ज  (exam form) भरण्याची मुदत संपली आहे. मात्र अनेक विद्यार्थी काही ना काही कारणांमुळे परीक्षा अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना (student) अर्ज भरण्याची शेवटची संधी (Last chance) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २५ मे रोजी केवळ एक दिवस विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 


 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यामधील विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सुमारे सव्वा सहा लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दरवर्षी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे प्राप्त होतात. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने येत्या ऑगस्ट महिन्यापूर्वी परीक्षा घेऊन विद्यापीठातर्फे निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने मे महिन्यापर्यंतच परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदत दिली. परंतु, दिलेल्या मुदतीमध्ये सुमारे दहा ते पंधरा हजार विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. या विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास मदत वाढ द्यावी, अशी मागणी केली होती. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. 


पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले, आत्तापर्यंत सुमारे ५ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. काही कारणास्तव परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना एक दिवस परीक्षा अर्ज भरण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. २४ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून २५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरू शकतील. २६ मे रोजी विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज महाविद्यालयाकडून तपासून विद्यापीठाकडे पाठविला जाईल. त्यानंतर प्राप्त होणारे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारला जाणार नाही. साधारणपणे ६ लाख २० ते २१ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज परीक्षा विभागाकडे प्राप्त होतात.येत्या २५ मे पर्यंत उर्वरित सर्व अर्ज येतील, अशी अपेक्षा आहे.