ZP शाळेतील पोरं हुशार; थेट 'नासा'मध्ये पडणार पाऊल

नासाकडे रवाना होण्याआधी या मुलांनी रविवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना कौतुकाची थाप दिली.

ZP शाळेतील पोरं हुशार; थेट 'नासा'मध्ये पडणार पाऊल
Governor Ramesh Bais with ZP students.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अंतराळाबद्दल तर प्रत्येकालाच उत्सुकता असते. एखादे विमान किंवा रॉकेट आकाशात झेपावताना पाहण्याचे कुतूहल मुलांना असते. ग्रामीण भागात सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना याविषयी फारसे ज्ञान मिळत नाही. त्यामुळे क्षमता असूनही विद्यार्थी (Student) या क्षेत्राकडे वळत नाहीत. रत्नागिरीमधील (Ratnagiri) जिल्हा परिषदेच्या शाळेतील (ZP School) विद्यार्थी मात्र याला अपवाद ठरले आहेत. इयत्ता सातवीतील नऊ विद्यार्थी थेट अमेरिकेतील ‘नासा’कडे (NASA) कुच करणार आहेत. अमेरिकेला जाण्याआधी या विद्यार्थ्यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची मुंबईत राजभवन येथे भेट घेतली. (Students from Zilla Parishad schools in Ratnagiri are going to visit NASA)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. https://www.eduvarta.com/

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता सातवीच्या ९ विद्यार्थ्यांची 'नासा' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला अभ्यास भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर परिक्षा घेण्यात आली होती. त्यातून हे नऊ विद्यार्थी अव्वल ठरले. नासाकडे रवाना होण्याआधी या मुलांनी रविवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना कौतुकाची थाप दिली.

विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी व त्यांच्यामधून वैज्ञानिक घडावे या दृष्टीने रत्नागिरी जि.प.च्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव व मार्गदर्शक शिक्षकही उपस्थित होते. विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी राबविण्यात आली आहे.

हेही वाचा : साताऱ्याचं वेगळंच पाणी, पहिलीतलं पोरगंही बोलतंय जपानी!

हुशार असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि संशोधक वृत्तीला वाव देणे, त्या दृष्टीने जिल्हा परिषदेकडून ही पावले उचलली जात आहेत. मिशन गगन भरारी या उपक्रमातंर्गत प्राथमिक शाळेतील हे विद्यार्थी आता नासा आणि इस्त्रोलाही भेटी देणार आहेत. या भेटीची विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षक, पालक व अधिकाऱ्यांनाही उत्सुकता आहे.

नासाच्या भेटीमध्ये हे विद्यार्थी कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, जोन्सन स्पेस सेंटर, सायन्स म्युझिअम कॉलॅब्रेटीव्ह इंटरनॅशनल स्पेस सेंटरला भेट देण्यासह केनडी स्पेट सेंटरमध्ये शटल प्रक्षेपणासह लिफ्ट ऑफ अनुभवणार आहेत. नासामध्ये असलेल्या चंद्रावरील दगडाच्या तुकड्याला स्पर्श करण्याची संधीही या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.