विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; आमदार रविंद्र धंगेकर यांनी 'आरटीओ'ला ठणकावले

स्कूल बस व स्कूल व्हॅन या वाहनांना शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे, असे धंगेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; आमदार रविंद्र धंगेकर यांनी 'आरटीओ'ला ठणकावले
MLA Ravindra Dhangekar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे (Pune) शहरात एकूण सहा हजार सहाशे सहा स्कूल बस (School Bus) व स्कूल व्हॅन आहेत. अधिकृत आकडेवारी पाहिली असता यामधील पंधराशे स्कूल बस व स्कूल व्हॅन (School Van) यांनी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक (Students Transport) करणाऱ्या वाहनांची फिटनेस तपासणी (Fitness Test) न करताच वाहतूक करत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. अशा वाहनांवर प्रभावीपणे कारवाई करण्याची मागणी आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (RTO) केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड सहन करणार नाही, असेही धंगेकर यांनी आरटीओला ठणकावले.

आमदार धंगेकर यांनी याबाबत पुणे आरटीओ कार्यालयाला पत्र दिले आहे. गेल्या काही वर्षात फिटनेस तपासणी न केलेल्या स्कूल बस व स्कूल व्हॅन यांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊन अप्रिय घटना घडूच नये, यासाठी अशा स्कूल बस व स्कूल व्हॅनवर त्वरित कारवाई होणे अपेक्षित आहे. स्कूल बस व स्कूल व्हॅन या वाहनांना शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे, असे धंगेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासगी विद्यापीठांमध्ये शुल्क सवलतीची अंमलबजावणी कधी? विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याच्या तक्रारी

शालेय वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व स्कूल व्हॅन मध्ये नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनात पॅनिक बटन, वाहनात वाहन वेग नियंत्रक म्हणजेच स्पीड गव्हर्नर बसविणे कायद्याने बंधनकारक आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनात अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, शालेय वाहतूक करणाऱ्या स्कूल बसमध्ये एक अटेंडंट असणे बंधनकारक व आवश्यक आहे. या बाबींचे काटेकोर पालन करणे शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व स्कूल व्हॅन यांनी करणे अपेक्षित आहे.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व स्कूल व्हॅन किमान दोन ते अडीच वर्ष अगदी शंभर टक्के बंद होत्या. व्यवसाय बंद असल्याने मिळणारे आर्थिक उत्पन्न संपूर्णपणे बंद होते. त्यामुळे स्कूल बस मालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यातून स्कूल बस मालकांना बाहेर काढण्यासाठी स्कूल बससाठी असलेले पंधरा वर्षे आयुष्य वाढवून वीस वर्ष करावे, अशी मागणीही धंगेकर यांनी केली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2