Engineering Diploma admission : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया १ जून पासून सुरु

प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून  https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे

Engineering Diploma admission : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया १ जून पासून सुरु
Engineering Admission Process

दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका (after 10th engineering diploma admission)अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२३ -२४  करिता येत्या १ जून २०२३  पासून प्रवेशास सुरुवात होणार आहे.ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी तंत्र शिक्षण विभागाकडून  https://dte.maharashtra.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी दिली.

 मंत्रालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर आदी उपस्थित होते.

 पाटील म्हणाले , राज्यातील पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा मागील चार वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्रशिक्षणातील पदविका ही रोजगारक्षम बनण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.  तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याचा तसेच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.
          तंत्र शिक्षण संचालक मोहितकर म्हणाले , औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन ९  शासकीय व ३०  विनानुदानित संस्थामध्ये  २  हजार ४६०  प्रवेशक्षमतेचे  न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये  Artificial Intelligence (AI) and Machine Learning; Mechatronics; Automation and Robotics; Cloud Computing and Big Data, Computer Engineering and IoT अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
---------------------------
            

पदविका प्रवेश प्रक्रियेची वैशिष्टे : 

 - दहावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १० वी चा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

-पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी  कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया १ जून २०२३  पासून सुरु करण्यात येणार आहे.

-केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.

-विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रिये व्यतिरिक्त ई-स्क्रुटीनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

-दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे. त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार आहे.