हिंदी सक्तीला 95% लोकांचा विरोध;राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव यांचे स्पष्टीकरण...

साधारणपणे 90 ते 95 टक्के लोकांना पाचवीपासून हिंदी हवी आहे. पहिलीपासून हिंदी लागण्यास 95 टक्के लोकांचा विरोध आहे.

हिंदी सक्तीला 95% लोकांचा विरोध;राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव यांचे स्पष्टीकरण...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात इयत्ता पहिली पासून हिंदी विषय सक्तीने (Hindi subject is compulsory) शिकवण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर शासनाने हा निर्णय मागे घेत याबाबत त्रिभाषा समितीची स्थापना केली होती. या समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव (narendra jadhav )यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)यांची भेट घेऊन समितीच्या संदर्भात माहिती दिली. राज्यातील 95 टक्के लोकांचा इयत्ता पहिली ते चौथीसाठी हिंदी भाषा लादण्यास विरोध असल्याचे जाधव यांनी सांगितले.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ ,रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांनी मुंबई येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव उपस्थित होते. या भेटीनंतर नरेंद्र जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

नरेंद्र जाधव म्हणाले, त्रिभाषा समितीने केलेल्या कामाची माहिती राज ठाकरे यांना देण्यात आली. समितीच्या कामाबाबत राज ठाकरे हे समाधानी आहेत. हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून चालू शकते.मात्र पहिले ते चौथीसाठी कुठल्याही प्रकारे हिंदीची सक्ती करू नये, इयत्ता पाचवी पासून हिंदी भाषा चालू शकेल,मात्र ती ऐच्छिक स्वरूपात ठेवावी,असे राज ठाकरे यांनी चर्चेदरम्यान सांगितले.

जाधव म्हणाले, त्रीभाषा समितीचा कालावधी येत्या 5  डिसेंबर पर्यंत आहे. दोन ते तीन डिसेंबर पर्यंत आमचा दौरा असल्यामुळे या संदर्भातील अहवाल देणे अशक्य आहे. परंतु 20 डिसेंबरपर्यंत शासनाला आम्ही आमचा अहवाल सादर करणार आहोत. साधारणपणे 90 ते 95 टक्के लोकांना पाचवीपासून हिंदी हवी आहे. पहिलीपासून हिंदी लागण्यास 95 टक्के लोकांचा विरोध आहे.