विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे घेऊन जाणा-या प्रदर्शनाची विद्यापीठात मेजवाणी ..

मुले अभ्यास का करत नाहीत, त्यांना अभ्यासाचा कंटाळा का येतो, त्यांच्या अभ्यासात सातत्य का राहत नाही, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव का आहे, तो दूर करण्यासाठी काय करायला हवे, आशा सर्व प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर मिळू शकतील.

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे घेऊन जाणा-या प्रदर्शनाची विद्यापीठात मेजवाणी ..
educational exhibition in savitribai phule pune university

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

     खेळ आणि अभ्यासाचे महत्त्व..  भारतीय पारंपारिक खेळ, आदर्श बालवाडी.. विज्ञान प्रयोगांची माहिती देणारी सायकल.. कौशल्य अभ्यासक्रम..  पूर्व प्राथमिकसाठी डिजिटल अभ्यासक्रम..  वाचन, गणन व लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी खेळणी आशा एक ना अनेक विषयांवरील शैक्षणिक माहिती देणारे शैक्षणिक प्रदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात (educational exhibition in savitribai phule pune university) भरवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, असे तुम्हाला वाटत असेल तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या,असे आवाहन जी २० परिषदेच्या संयोजकांकडून करण्यात आले आहे.
             पुण्यात होत असलेल्या जी २० परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून कृती आधारित शिक्षण पद्धतीद्वारे मुलांना आनंददायी शिक्षण मिळावे या उद्देशाने 'पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र' प्रदर्शन भरवण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, जी २० परिषदेचे समन्वयक राजेश पांडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, डॉ.आदित्य अभ्यंकर आदी उपस्थित होते. प्रदर्शनात युनिसेफ, एनएसडीसी, एनसीईआरटी, नॅशनल बूक स्ट, भारतीय नॉलेज सिस्टम्स्‌‍ डिव्हिजन, मायक्रोसॉफ्ट, गूगल, स्टार्ट अप तसेच विविध राज्य शासनांच्या  शिक्षण विभागांनी सहभाग घेतला आहे.  
     पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाबरोबर मुलांचा गणिती व वैज्ञानिक दृष्टिकोन, कौशल्य शिक्षण, आकलन, निरिक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित व्हाव्यात यासाठी शैक्षणिक साहित्य येथे उपलब्ध आहे. भारतीय ज्ञान परंपरेबरोबर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांचा प्रदर्शनात समावेश आहे. प्रदर्शनात शंभरहून अधिक शिक्षणसंस्था आणि उत्पादकांची दालने असून 22 जून पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. 
          मुले अभ्यास का करत नाहीत, त्यांना अभ्यासाचा कंटाळा का येतो, त्यांच्या अभ्यासात सातत्य का राहत नाही, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव का आहे, तो दूर करण्यासाठी काय करायला हवे, आशा सर्व प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर मिळू शकतील.कारण या प्रदर्शनात विविध स्टॉल असून वैविध्यपूर्ण डिजिटल साहित्यांच्या माध्यमातून कसे शिकावे, यांची उकल होणार आहे.विद्यार्थ्यांना  55 भाषांतील पुस्तके,  प्रात्यक्षिके, कोडी, सामान्यज्ञान, प्रश्नमंजूषा, गोष्टी, कविता आदी गोष्टींचा आस्वाद या प्रदर्शनातून घेता येणार आहे.
 ------------------------- 

प्रदर्शन का पाहावे?
*लेखन, वाचन व गणन या प्रक्रिया सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी
*मुलांची बुद्धिमत्ता आणि कौशल्यात वृद्धी करण्यासाठी
*आकलन, निरीक्षण, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णय प्रक्रिया या मूलभूत प्रक्रिया विकसित होण्यासाठी
*पायाभूत क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणासाठी
*मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, अध्यात्मिक विकासासाठी