सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 'एनएसएस'चा विश्वविक्रम; तब्बल १० लाख ४२ हजार ५३८ सेल्फीची 'गिनीज'मध्ये नोंद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागील पाच वर्षांत केलेला हा तिसरा विश्वविक्रम ठरला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 'एनएसएस'चा विश्वविक्रम; तब्बल १० लाख ४२ हजार ५३८ सेल्फीची 'गिनीज'मध्ये नोंद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) महाराष्ट्र यांनी संयुक्तमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली आहे. 'सेल्फी विथ मेरी माटी' (Selfie with Meri Mati) या अभिनव मोहिमेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये (Guinness World Records) झाली आहे. या मोहिमेत तब्बल १० लाख ४२ हजार ५३८ युवक व नागरिकांनी सेल्फी अपलोड केले आहेत.

 

चीनने डिसेंबर २०१६ मध्ये असा विक्रम केला होता. यामध्ये १ लाख २४ हजार ४६० सेल्फीची नोंद झाली होती. त्यानंतर सात वर्षांनंतर हा विक्रम मोडित निघाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागील पाच वर्षांत केलेला हा तिसरा विश्वविक्रम ठरला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण; ७ विद्यापीठे टॉप १०० मध्ये

 

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.

 

देशाच्या युवकांमध्ये देशप्रेम जगावणाऱ्या मेरी माटी, मेरा देश या अभियानाची नुकतीच सांगता झाली. या अभियानाच्या अनुषंगाने 'सेल्फी विथ मेरी माटी' ही अभिनव मोहीम महाराष्ट्रात राबविण्यात आली. याअंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल २५ लाखांहून युवकांनी, नागरिकांनी याला प्रतिसाद देत सेल्फी अपलोड केले. यापैकी १० लाख ४२ हजार ५३८ सेल्फी ग्राह्य धरत त्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.

 

गिनीज बुकचे भारतातील प्रतिनिधी ऋषीनाथ यांनी हा विश्वविक्रम झाल्याची घोषणा केली. त्यांच्या हस्ते राजेश पांडे यांनी विश्वविक्रम प्रमाणपत्र स्वीकारले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इतर मान्यवरांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण टीमचे कौतूक केले. विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे या विश्वविक्रमात मोलाचे योगदान राहिले आहे. विद्यार्थ्यांनी तीन शिफ्टमध्ये काम करत राज्यभरातून आलेले सेल्फी अपलोड करणे व इतर तांत्रिक कामांसाठी मोठे परिश्रम घेतले. त्यांचेही कार्यक्रमात विशेष कौतूक करण्यात आले. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO