शिक्षकांचे पगार का रखडले; 'या' तारखेला होणार पगार
गेल्या काही महिन्यांपासून ही पगार बिले वेळेत तयार होऊन ट्रेझरीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे निधी असूनही शिक्षकांचे वेतन रखडते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षकांचे पगार (Salary of teachers)महिन्याच्या एक तारखेला करण्याचे निर्देश असले तरी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे शिक्षकांच्या पगाराला विलंब (Delay in teachers salaries) होतो. अर्धा एप्रिल महिना संपत आला तरी अजूनही पुणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन झालेले नाही. मात्र, येत्या मंगळवारी (१५ रोजी) शिक्षकांचे रखडलेले पगार होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षकांना पगारासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
सर्व शाळांनी 22 तारखेपर्यंत पगार बिले जमा करणे अपेक्षित आहे. त्यावर आवश्यक कार्यवाही करून पे युनिट कडून संबंधित पगार बिले ट्रेजरीकडे पाठविले जातात. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ही पगार बिले वेळेत तयार होऊन ट्रेझरीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे निधी असूनही शिक्षकांचे वेतन रखडते . शिक्षकांना घराचे हप्ते, गाडीचे हप्ते तसेच दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे पैसे यासाठी पगारावर अवलंबून राहावे लागते. परंतु, पगार उशिरा होत असल्याने अनेक शिक्षकांची आर्थिक ओढाताण होत आहे.
शिक्षकांचे पगार वेळेत व्हावेत, यासाठी शिक्षक संघटना पे युनिट व ट्रेझरी मधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी ट्रेझरी मधील अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांच्या पगाराबाबत चर्चा केली. 'एज्युवार्ता'शी बोलताना शिंदे म्हणाले, शिक्षकांच्या निवेदनासाठी आवश्यक असणाऱ्या निधी वर्ग करण्यात आला असून पगार बिले ट्रेझरी मध्ये पाठविण्यात आली आहेत. सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे शिक्षकांचे वेतन आता मंगळवारी 15 एप्रिल रोजी होणार आहेत,असे ट्रेझरी मधील अधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनेला सांगितले.