SBI युथ फॉर इंडिया फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
अर्जदार https://register.youthforindia.org या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
तरुण पदवीधर आणि व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) शाखा असलेल्या SBI फाउंडेशनने त्यांच्या प्रमुख SBI युथ फॉर इंडिया फेलोशिपच्या (SBI Youth for India Fellowship begins) १३ व्या बॅचसाठी अर्ज मागवले आहेत. ही १३ महिन्यांची सशुल्क फेलोशिप तरुण पदवीधर आणि व्यावसायिकांना ग्रामीण भारतात शाश्वत विकास उपक्रम राबविण्याची संधी निर्माण करून देणार आहे.
हा कार्यक्रम भारतीय नागरिक,भारताचे परदेशी नागरिक (OCI) आणि नेपाळ आणि भूतानमधील २१-३२ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी खुला आहे, जे ग्रामीण परिवर्तनात योगदान देण्यास उत्सुक आहेत. अर्जदार https://register.youthforindia.org या अधिकृत वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ आहे.
SBI युथ फॉर इंडिया फेलोशिप शहरी तरुणांना ग्रामीण समुदायांसोबत आणि भारतातील १३ आघाडीच्या भागीदार एनजीओंसोबत जवळून काम करण्यास सक्षम करते. फेलो शिक्षण, आरोग्य, ग्रामीण उपजीविका, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि तंत्रज्ञानासह १२ विषयगत क्षेत्रांमध्ये विस्तारित प्रकल्पांमध्ये सहभागी होतात.
राष्ट्र उभारणीतील फेलोशिपच्या भूमिकेविषयी सांगताना, एसबीआय फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संजय प्रकाश म्हणाले, "एसबीआय युथ फॉर इंडिया फेलोशिप ग्रामीण भारतात परिवर्तनकारी बदल घडवून आणण्यासाठी तरुणांना सक्षम बनवून 'विक्षित भारत'च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. महत्त्वाच्या विषयगत क्षेत्रांवर काम करून, फेलो केवळ समुदाय विकासात योगदान देत नाहीत तर त्यांचे नेतृत्व आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये देखील विकसित करतात. आम्ही उत्साही तरुणांना आपल्या राष्ट्राचे भविष्य घडवण्यासाठी आणि कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्यासाठी आमच्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो."
दरम्यान, २०११ मध्ये स्थापन झाल्यापासून, या फेलोशिपने ६४० फेलोना पाठिंबा दिला आहे, ज्याने तळागाळातील २० राज्यांमधील २५० गावांमधील १.५ लाखांहून अधिक नागरिकांवर परिणाम केला आहे.