बारावीच्या उत्तरपत्रिका कोण तपासणार ? चीफ मॉडरेटर यांचा पहिल्याच बैठकीवर बहिष्कार

मुख्य नियमक यांची बैठक घेऊन उत्तरपत्रिका तपासणीबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातात. मात्र, या बैठकीवरच बहिष्कार घालण्यात आला.

बारावीच्या उत्तरपत्रिका कोण तपासणार ? चीफ मॉडरेटर यांचा पहिल्याच बैठकीवर बहिष्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता बारावीच्या परीक्षेस (12th exam) आजपासून सुरुवात झाली असली तरी राज्यातील शिक्षकांनी (Teacher)उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार(Boycott of answer sheet checking work)घातला आहे. बुधवारी सकाळी पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या (Pune Divisional Board of Education) अधिकाऱ्यांना मुख्य नियामक (चीफ मॉडरेटर- Chief Moderator) यांनी उत्तरपत्रिका तपासणीच्या पहिल्याच बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे निवेदन दिले. तसेच प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा आज पहिला दिवस होता. परीक्षेच्या पहिल्या दिवसापासूनच उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाते. मुख्य नियामक यांची बैठक घेऊन उत्तरपत्रिका तपासणीबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातात. मात्र, या बैठकीवरच बहिष्कार घालण्यात आला. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम थांबले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे सरचिटणीस संतोष फाजगे यांच्यासह मुकुंद आंधळकर, लक्ष्मण रोडे, विक्रम काळे, संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राहूल गोलांदे , हिम्मत तोबरे, स्मिता वर्पे, लक्ष्मण दहिफळे आदी यावेळी उपस्थित होते.

संतोष फाजगे म्हणाले, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे10,20,30 वर्षाची अशाश्वित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी, सर्व वाढीव पदांना मंजुरी द्यावी व आयटी विषय शिक्षकांना वेतनश्रेणी द्यावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलन करण्यात आले. शिक्षकांनी आंदोलन सुरू केले असले तरी विद्यार्थ्यांनी कोणताही ताण घेऊ नये. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्यानंतर नियोजित वेळेत उत्तरपत्रिका तपासण्याचे काम आम्ही पूर्ण करू. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे.