शिक्षक भरती जाहिरातीसाठी अजून १० ते १५ दिवसांची प्रतिक्षा?

राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी पात्र असणारे अनेक बेरोजगार शासनाकडून शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा काढली जाते, याकडे डोळे लावून बसले आहेत.

शिक्षक भरती जाहिरातीसाठी अजून १० ते १५ दिवसांची प्रतिक्षा?
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील लाखो बेरोजगार सध्या शिक्षक भरतीच्या (Teachers Recruitment) जाहिरातीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच दोन दिवसांपासून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) आणि एका तरुणीचा शिक्षक भरतीसंदर्भातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, राज्यातील सर्व जिल्ह्यांची जाहिरात एकाच वेळी प्रसिध्द केली जाणार असून त्यासाठी आणखी १० ते १५ दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे शिक्षण विभागातील (Education Department) विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. 

 

राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे शिक्षक होण्यासाठी पात्र असणारे अनेक बेरोजगार शासनाकडून शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा काढली जाते, याकडे डोळे लावून बसले आहेत. दीपक केसरकर यांनी राज्यात ३० हजार शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार असल्याचे घोषित केले. परंतु, रिक्त जागांची माहिती जमा करणे, रोष्टर तपासणी, समान आरक्षण तपासणी यासह अनेक प्रशासकीय बाबींमूळे शिक्षक भरतीस विलंब होत आहे. 

भावी शिक्षिकेचं काय चुकलं? केसरकरांकडून वर्षभरापुर्वी भरतीची घोषणा, अजून एकही जाहिरात नाही...

 

अजूनही सर्व जिल्ह्यांचे समांतर आरक्षण तपासणीचे काम पूर्ण झाले नाही. तसेच २०१७ च्या  भरतीमधील सुमारे दीड ते दोन हजार उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे प्रथमत: या उमेदवारांचा विषय संपवला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची जाहिरात एकाच वेळी प्रसिध्द केली जाणार आहे.

 

दीपक केसरकर हे शिक्षक भरतीबाबत माहिती विचारणा-या महिलेला चांगलेच भडकल्याचे व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे. तसेच तुम्हाला अपात्र करू शकतो, अशी तंबी केसरकर यांनी दिली. मात्र, अनेक वर्षांपासून रखडलेल्या भरतीची घोषणा होते. परंतु, ती केव्हा सुरू होणार? असा प्रश्न विचारणे यात चूक काय? मंत्र्यांनी संयम बाळगणे आवश्यक होते, अशी चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात सुरू आहे.

 

सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. नगरपालिका व महानगर पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या भरतीचे काम अजूनही सुरू आहे. त्यास थोडा उशीर होणार आहे. मात्र,राज्यातील सर्व जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीची जाहिरात एकाच वेळी प्रसिध्द होईल. त्यासाठी आणखी १० ते १५ दिवस वाट पहावी लागणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO