भावी शिक्षिकेचं काय चुकलं? केसरकरांकडून वर्षभरापुर्वी भरतीची घोषणा, अजून एकही जाहिरात नाही...

बीडमध्ये रविवारी एका कार्यक्रमानंतर दीपक केसरकर हे माध्यमांशी बोलत असताना महिला शिक्षक उमेदवाराने त्यांनी भरतीबाबत प्रश्न विचारले. केसरकर हे भरतीबाबत सांगत असताना महिलेकडून त्यांना मध्येच प्रतिप्रश्न केला जात होता.

भावी शिक्षिकेचं काय चुकलं? केसरकरांकडून वर्षभरापुर्वी भरतीची घोषणा, अजून एकही जाहिरात नाही...

राजानंद मोरे

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि एका भावी शिक्षिकेमधील संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलेच्या सततच्या प्रश्नांनी चिडलेल्या केसरकरांनी थेट भरतीत (Teachers Recruitment) अपात्र करण्याची तंबी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या महिलेला सबुरीचा सल्ला देताना शिक्षणमंत्री मात्र चिडले होते. प्रत्यक्षात वर्षभरापुर्वी भरतीची घोषणा करण्यात आली होती. अद्याप एकही जाहिरात निघालेली नाही. मग या पात्र उमेदवारांनी किती दिवस सबुरी दाखवायची, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्या महिलेचा संताप योग्यच होता, असा सुर शिक्षणक्षेत्रात उमटत आहे.

 

बीडमध्ये रविवारी एका कार्यक्रमानंतर दीपक केसरकर हे माध्यमांशी बोलत असताना महिला शिक्षक उमेदवाराने त्यांनी भरतीबाबत प्रश्न विचारले. केसरकर हे भरतीबाबत सांगत असताना महिलेकडून त्यांना मध्येच प्रतिप्रश्न केला जात होता. त्यानंतर केसरकर चिडलेले दिसले. त्याच स्वरात त्यांनी ही बेशिस्त अजिबात मान्य नसल्याचे सांगत भरतीत अपात्र करण्याची तंबी दिली. पण तरीही ही महिला आपला त्रागा मांडण्याचा प्रयत्न करतच होती.

तुमचे नाव घेऊन अपात्र करायला लावेन; केसरकरांची भावी शिक्षिकेला तंबी अन् विरोधकांनी उगारली छडी

 

केसरकरांच्या या वक्तव्यावरून विरोधकांना त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच भावी शिक्षकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे. संबंधित महिलेनेही नाराजी व्यक्त करत केसरकरांनी असे बोलायला नको होते, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी केसरकरांवर टीका केली आहे.

 

काय आहे भरती प्रक्रियेची स्थिती?

मंत्री केसरकर यांनी २४ डिसेंबर २०२२ रोजी शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याची घोषणा केली. याबाबतचे ट्विट अजूनही त्यांच्या ट्विटरवर आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरती रखडलेली होती. म्हणूनच ५०% टक्के पदे तातडीने भरली जाण्याची घोषणा केली. अर्थ खात्याकडून शिक्षकांच्या ८०% भरतीला मंजुरी यावेळी दिली. नवीन वर्षात ३०,००० पदे भरली जातील तसेच, २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या कोणत्याही शाळा बंद केल्या जाणार नाहीत, असे केसरकर यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

केसरकरांच्या घोषणेला ११ महिने उलटून गेले आहेत. पण अजून भरतीची एकही जाहिरात निघालेली नाही. लाखो उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. संस्थांना जाहिरात जनरेट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्येक जिल्ह्यात किती जागा उपलब्ध आहेत, याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. राज्यात एकाच वेळी सर्व जिल्हा परिषदांची जाहिरात प्रसिध्द केली जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी सांगतात. पण ही प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत अजूनही संभ्रम आहे.

 

शिक्षक उमेदवारांना सद्यस्थितीबाबत माहिती मिळत नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मागील काही वर्षांपासून शिक्षक भरती न झाल्याने उमेदवार हतबल झाले आहेत. त्यातच सध्याची प्रक्रियाही रेंगाळली असल्याने आता त्यांचा संयम संपू लागला आहे. अशा स्थितीत उमेदवारांचा संभ्रम दूर करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आणि मंत्र्यांचीही आहे. पण उमेदवारांनाच अपात्र करण्याची तंबी देत शिक्षणमंत्र्यांनीच संयम सोडल्याचे दिसले. मग अनेक वर्षांपासून भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांचा संयम सुटत असेल तर त्यांचं काय चुकले?

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO